तालिबानला अफगाणी जनतेने निवडलेले नाही

- अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री कॉन्डोलिझा राईस

कॉन्डोलिझा राईसवॉशिंग्टन – ‘अमेरिकेच्या बरोबरीने अफगाणी देखील तालिबानच्या विरोधात लढले होते. अफगाणींनीही या युद्धात आपले रक्त सांडलेले आहे. अफगाणी जनतेने तालिबानची निवड केलेली नाही’, असे अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री कॉन्डोलिझा राईस यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अफगाणिस्तानात तालिबानला मिळालेले यश हे अफगाणी सरकार, अफगाणी लष्कर व अफगाणी जनतेचे अपयश असल्याचा दावा केला होता. अफगाणी जनतेच्या अपयशासाठी अमेरिकेला जबाबदार धरता येणार नाही, असे सांगून बायडेन यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले होते. त्याला माजी परराष्ट्रमंत्री कॉन्डोलिझा राईस यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले.

वॉशिंग्टन पोस्ट नावाच्या अमेरिकी वर्तमानपत्रातील आपल्या लेखात माजी परराष्ट्रमंत्री राईस यांनी अफगाणिस्तानातील आत्ताच्या भयंकर स्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली. 2001 ते 2005 या काळात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, तर 2005 ते 2009 या काळात परराष्ट्रमंत्री म्हणून कॉन्डोलिझा राईस यांनी अमेरिकेच्या अफगाणिस्तानविषयक धोरणात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे दावे खोडून काढून राईस यांनी नेमक्या शब्दात त्यांच्या धोरणातील विसंगती या लेखाद्वारे दाखवून दिली.

9/11 हल्ल्याला 20 वर्षे पूर्ण होण्याच्या एक महिना आधी अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी काबुल विमानतळावर विमानाला लटकलेले अफगाणी पाहणे अतिशय वेदनादायी ठरते. हे अशारितीने घडायला नको होते. 9/11 चा हल्ला ज्या देशातून झाला, त्या देशाकडे पाठ फिरविणे अमेरिकेला परवडणारे नाही. तसेच अफगाणिस्तानातील परिस्थितीला सर्वस्वी अफगाणी सरकार व जनताच जबाबदार आहे, असे मानणे योग्य ठरणार नाही’, असे कॉन्डोलिझा राईस यांनी या लेखात बजावले.

कॉन्डोलिझा राईसअमेरिकन सैनिकांच्या बरोबरीने अफगाणींनी देखील तालिबानविरोधी युद्धात आपले रक्त सांडले होते. अफगाणी जनतेने तालिबानची निवड केलेली नाही. अमेरिकेची सैन्यशक्ती व हवाई दलाची ताकद नसताना अफगाणी सैनिक तालिबानचा सामना करू शकत नाही, हे उघड होते. त्यातच अमेरिकेचे सैन्य माघारघेत असताना, जो कुणी आपल्या विरोधात खडा ठाकेल, त्याचे कुटुंब संपविले जाईल, अशी धमकी तालिबानने दिली होती, याकडे लक्ष वेधून राईस यांनी अफगाणी लष्कराच्या अपयशाचे हेच महत्त्वाचे कारण असल्याचा खुलासा केला.

20 वर्षे लढूनही अफगाणिस्तानात अमेरिकेच्या हाती काही लागले नाही, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले होते. पण सातव्या शतकापासून चालत आलेली मानसिकता आणि 30 वर्षाचे गृहयुद्ध याच्या कचाट्यात सापडलेल्या अफगाणिस्तानसाठी 20 वर्षांचा अवधी मोठा ठरत नाही. अफगाणिस्तानपेक्षाही अमेरिकेचे कोरियातले युद्ध अधिक लांबले होते. दक्षिण कोरियासारख्या उदारमतवादी देशात 28 हजार सैनिक तैनात ठेवून या युद्धाची अखेर झाली. या तैनातीद्वारे अमेरिकेने दक्षिण व उत्तर कोरियामध्ये ताकदीचा समतोल राखलेला आहे, याची आठवण माजी परराष्ट्रमंत्री राईस यांनी करून दिली.

राईस यांनी अमेरिकेची अफगाणिस्तानातील सैन्यमाघार अमेरिकेच्या पाठिराख्यांसाठी भयंकर ठरलेली आहे, याची जाणीव करून दिली. तसेच अमेरिकेला याचे दूरगामी परिणाम सहन करावे लागतील, असा इशारा देऊन कॉन्डोलिझा राईस यांनी यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन जबाबदार असतील, असे बजावल्याचे दिसत आहे.

leave a reply