तालिबानकडून पंजशीरमध्ये २० नागरिकांची हत्या

- अफगाणिस्तानात हत्याकांड सुरू असल्याची चिंता

२० नागरिकांची हत्यालंडन/जीनिव्हा/काबुल – तालिबानने पंजशीर खोर्‍यात किमान २० नागरिकांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पंजशीरमधील एका दुकानदाराचा अनन्वित छळ करून व त्यानंतर त्याला भर रस्त्यात गोळी घालून ठार केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तसेच तालिबान गनी सरकारच्या काळात सेवेत असलेल्या कर्मचार्‍यांचेही हत्याकांड घडवित असल्याचा गंभीर आरोप संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार संघटनेने केला आहे. यामुळे तालिबान ही दहशतवादी संघटना नाही, असे दावे करणारे सारेजण अडचणीत आले आहेत.

२० नागरिकांची हत्याआठवड्यापूर्वी तालिबानने पंजशीरवर पूर्ण नियंत्रण मिळविल्याचे जाहीर केले. नॉर्दन अलायन्सचे नेते अहमद मसूद आणि माजी राष्ट्राध्यक्ष अमरूल्ला सालेह पंजशीरमधून फरार झाले असल्याचा अपप्रचार तालिबान व तालिबानच्या समर्थकांनी केला होता. पण मसूद व सालेह अजूनही पंजशीरच्या खोर्‍यांमधून संघर्ष करीत असल्याची कबुली तालिबानला दोन दिवसांपूर्वीच द्यावी लागली. तर पंजशीरमध्ये नॉर्दन अलायन्सचे जवान आणि तालिबानच्या दहशतवाद्यांमध्ये संघर्ष सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत.

पंजशीरवर नियंत्रण मिळविण्यासाठी तालिबानने या भागातील अन्नधान्य आणि पाण्याचा पुरवठा बंद केला. तसेच वीजपुरवठा खंडीत केल्याचा आरोप नॉर्दन अलायन्सने केला होता. पंजशीरमधील मुले आणि वृद्धांना तालिबान ठार करीत असल्याचा ठपका नॉर्दन अलायन्सने ठेवला होता. तालिबानने आपल्यावरील हे आरोप फेटाळले होते. पण आता नॉर्दन अलायन्सला सहाय्य केल्याचा आरोप करून तालिबानने पंजशीरच्या नागरिकांची भर रस्त्यात हत्या घडविल्याचा व्हिडिओच समोर आला आहे.

२० नागरिकांची हत्यापंजशीरमधील एका दुकानदाराला नॉर्दन अलायन्सचा जवान म्हणून तालिबानने गोळ्या घालून ठार केले. त्याआधी दहशतवाद्यांनी या दुकानदाराचा अनन्वित छळ केल्याचे त्याच्या शरीरावरील जखमांवरुन दिसत असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. ब्रिटनच्या आघाडीच्या वृत्तवाहिनीने तालिबानच्या या घृणास्पद कृत्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. तालिबानने अशाप्रकारे किमान २० जणांची हत्या घडविल्याचे या वृत्तवाहिनीने म्हटले आहे. पंजशीरबरोबरच तालिबानचे दहशतवादी अफगाणिस्तानच्या इतर भागातही आपल्या विरोधकांची तसेच गनी सरकारच्या समर्थकांची धरपकड करून हत्या घडवित असल्याचे समोर आले आहे.

तालिबानच्या दहशतवाद्यांनी राजधानी काबुलमध्ये चार जणांना अटक करून गाडीच्या डिकीमध्ये कोंबल्याचा व्हिडिओ समोर आला होता. यानंतर तालिबानने त्यांचे काय केले, ते अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण तालिबानचे दहशतवादी अफगाणिस्तानात मोठे हत्याकांड घडवित असल्याचा गंभीर आरोप जीनिव्हा येथील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार संघटनेच्या प्रमुख मिशेल बॅशलेट यांनी केला. अफगाणी जनतेकडून होणार्‍या या आरोपांकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याचे बॅशलेट म्हणाल्या.

leave a reply