काबुलमध्ये निदर्शने करणार्‍या महिलांवर तालिबानच्या दहशतवाद्यांचा गोळीबार

- कतारची तालिबानवर जळजळीत टीका

निदर्शने करणार्‍या महिलांवरदोहा/काबुल – महिलांना नोकरीव्यवसाय व मुलींना शिक्षणाचा अधिकार नाकारणार्‍या तालिबानच्या विरोधात अफगाणिस्तानातील महिला जीवावर उदार होऊन निदर्शने करीत आहेत. राजधानी काबुलमध्ये निदर्शने करणार्‍या महिलांवर तालिबानच्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यात कुणाचाही बळी गेला नाही किंवा कुणीही जखमी झालेले नले तरी याचे पडसाद उमटत आहेत. आपल्या देशात तालिबानला राजकीय कार्यालय उघडून देणार्‍या कतारने देखील तालिबानच्या या धोरणांवर सडकून टीका केली.

तालिबानचे हे धोरण निराश करणारे आहे. मुलींना शिक्षण नाकारुन तालिबान अफगाणिस्तानला मागे ढकलत आहे. इस्लामी व्यवस्था कशी असावी, याचे धडे तालिबानने कतारपासून घ्यावे’, असा टोला कतारने लगावला आहे. कतारचे परराष्ट्रमंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल थानी यांनी यासाठी आपल्या देशाने महिलांना बहाल केलेल्या अधिकारांकडे तालिबानचे लक्ष वेधले.

कतारमध्ये इस्लामी व्यवस्था असली तरी येथे महिलांना उच्चशिक्षण आणि सरकारी कामांमध्ये प्रोत्साहित केले जाते. कतारमधील कार्यालयिन कामकाजात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक असल्याचा दावा परराष्ट्रमंत्री थानी यांनी केला. पण अफगाणिस्तानात तालिबान महिला-मुलींवर करीत असलेले अत्याचार निराश करणारे असल्याचे ताशेरे कतारच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे.

निदर्शने करणार्‍या महिलांवरतालिबानने सत्तेवर येताच नोकरी व्यवसाय करीत असलेल्या अफगाणी महिलांना घरी बसण्याचे आदेश दिले. त्यानंतर अफगाणिस्तानातील मुलींच्या शिक्षणावर बंदी लादली. तालिबानच्या या धोरणाविरोधात अफगाणी महिलांनी निदर्शने पुकारली आहेत. ‘आमची लेखणी तोडू नका, पुस्तके जाळू नका, शाळा बंद करू नका’, अशा घोषणा देत अफगाणी महिलांनी निदर्शने केली.

काबुलमधील शाळेसमोर सुरू असलेल्या या महिला निदर्शकांवर तालिबानने कारवाई केली. यावेळी तालिबानच्या दहशतवाद्यांनी महिला निदर्शकांच्या हातातील बॅनर्स फाडले. तर काही दहशतवाद्यांनी महिलांना धक्काबुक्की करुन गोळीबार केला. सदर निदर्शने आणि तालिबानच्या कारवाईचे चित्रण करणार्‍या पत्रकाराला रायफलने मारहाण करण्यात आली.

अशा कारवायांमुळे तालिबानला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळण्याची शक्यता निकालात निघाली आहे. तालिबानचे समर्थक असलेले पाकिस्तान व चीन देखील अशा कारवायांमुळे तालिबानला मान्यता देताना कचरत आहेत. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये तालिबानच्या या कट्टरवादी धोरणांविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाल्याचे दिसत आहे.

leave a reply