आत्मघाती हल्लेखोरांच्या नातलगांना तालिबानचे ईनाम

ईनामकाबुल – अफगाणिस्तानातील याआधीचे सरकार व पाश्‍चिमात्य देशांच्या लष्करावर आत्मघाती हल्ले चढविणारे दहशतवादी हे खरे नायक आहेत, अशी घोषणा मोस्ट वॉंटेड दहशतवादी असलेल्या सिराजुद्दीन हक्कानी याने केली. त्याचबरोबर गेल्या वीस वर्षांमध्ये अफगाणिस्तानात आत्मघाती हल्ले चढविणार्‍या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना तालिबानने पैसा, कपडे आणि भूखंड ईनाम म्हणून दिले. ही बाब तालिबानला अधिक अडचणीत टाकणारी ठरू शकते.

अफगाणिस्तानची राजधानी काबुलच्या ‘इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल’मध्ये तालिबानने दहशतवाद्यांची बैठक आयोजित केली होती. गेल्या वीस वर्षांमध्ये तालिबानसाठी आत्मघाती हल्ले चढविणार्‍या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना या बैठकीत बोलाविले होते. तालिबानच्या राजवटीतला हंगामी अंतर्गत सुरक्षामंत्री सिराजुद्दीन हक्कानी या बैठकीत हजर होता. यावेळी सिराजुद्दीनने आत्मघाती दहशतवाद्यांना नायक ठरविले. त्याचबरोबर या आत्मघाती दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना १० हजार अफगानी, कपडेलत्ते देऊन भूखंड देण्याचीही घोषणा केली. तालिबानचा प्रवक्ता कारी सईद खोस्ती याने याची माहिती सोशल मीडियावरुन उघड केली. त्याचबरोबर सिराजुद्दीन हक्कानी उपस्थित असलेल्या सभेचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले. पण यात सिराजुद्दीन हक्कानीचा चेहरा दिसणार नाही, याची काळजी घेण्यात आलेली आहे.

ईनामसिराजुद्दीन हक्कानी हा अमेरिकेच्या मोस्ट वॉंटेड यादीत असून अमेरिकेने त्याची माहिती देणार्‍यासाठी एक कोटी डॉलर्सचे ईनाम जाहीर केले आहे. अफगाणिस्तानात तैनात अमेरिकी जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यांचा सूत्रधार सिराजुद्दीन हक्कानी होता. त्यामुळे अमेरिकेने त्याला वॉंटेड जाहीर केले होते.

दरम्यान, तालिबान यापुढे आत्मघाती हल्ल्यांचे समर्थन करणार नसल्याचे तालिबानच्या बड्या नेत्याने काही आठवड्यांपूर्वी जाहीर केले होते. तालिबानमध्ये मोठा बदल झाल्याचे दाखवून देण्यासाठी तालिबानच्या नेत्यांनी ही घोषणा केली होती. पण सिराजुद्दीन हक्कानी याने आत्मघाती हल्लेखोरांना नायक ठरवून त्यांच्या कुटुंबियांना ईनाम दिल्यामुळे तालिबानसमोरील अडचणी वाढू शकतात. तालिबानचा दहशतवादी चेहरा यामुळे पुन्हा एकदा जगासमोर आलेला आहे.

तालिबानकडून महिला खेळाडूचा शिरच्छेद 

ईनामकाबुल – अफगाणी मुली व महिलांचे स्वातंत्र्य हिरावून घेणार्‍या तालिबानने महिला व्हॉलीबॉलपटूचा शिरच्छेद केल्याची हादरवून टाकणारी घटना समोर येत आहे. महजबिन हकिमी असे या दुर्दैवी मुलीचे नाव असल्याचे पर्शियन इंडिपेंडन्ट या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

महजबिन हकीमी ही काबुल क्लबसाठी खेळत होती व संघाची महत्त्वाची खेळाडू होती. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला तालिबानच्या दहशतवाद्यांनी दिवसाढवळ्या महजबिनची गळा चिरुन हत्या घडविली. तसेच याची वाच्यता करणार्‍यांना ठार करण्याची धमकीही तालिबानने दिली होती. त्यामुळे ही भयंकर घटना त्यावेळी जगासमोर येऊ शकली नाही.

तालिबानचे दहशतवादी अफगाणिस्तानात महिला खेळाडूंच्या शोधात असल्याच्या बातम्या याआधी येत होत्या. यातल्या काहीजणी अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यात यशस्वी झाल्या. पण महजबिनसारख्या कितीतरी मुली अजूनही अफगाणिस्तानात अडकलेल्या आहेत.

 

leave a reply