काबुलमध्ये अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाजवळ तालिबानचे रॉकेट हल्ले

रॉकेट हल्लेकाबुल – अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांच्या निवासस्थानाजवळ मंगळवारी सकाळी रॉकेट हल्ले झाले. अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्याची तालिबानची इच्छा नाही, हे त्यांनी या हल्ल्यातून दाखवून दिल्याचा आरोप अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष गनी यांनी केला. गेल्या वर्षी दोहा येथे झालेल्या करारानुसार तालिबानने राजधानी काबुल व इतर प्रांतांच्या राजधानींवर हल्ले चढविणार नसल्याचे मान्य केले होते. पण मंगळवारच्या हल्ल्यानंतर तालिबानने हा समझौता मोडीत काढल्याचे दिसते.

राजधानी काबुलमधील राष्ट्राध्यक्ष गनी यांच्या निवासस्थानात मंगळवारी प्रार्थना सुरू असताना संरक्षित भिंतीपलिकडे थोड्या अंतरावर तीन रॉकेट हल्ले झाले. यावेळी राष्ट्राध्यक्ष गनी तसेच त्यांचे सर्व सहकारी देखील उपस्थित होते. या हल्ल्यांमध्ये जीवितहानी झाली नसल्याचे अंतर्गत सुरक्षा विभागाचे प्रवक्ते मिरवाईज स्तानिकझई यांनी सांगितले. रॉकेट हल्ल्यांनंतरही राष्ट्राध्यक्षांनी प्रार्थना सुरू ठेवली आणि त्यानंतर अफगाणी जनतेला संबोधित केले.

अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत, हा संदेश घेऊन डॉ. अब्दुल्ला कतारच्या बैठकीत गेले होते. पण तालिबानलाच अफगाणिस्तानात शांतता व स्थैर्य प्रस्थापित करायची इच्छाच नाही. आता यापुढचा निर्णय आपल्याला करायचा आहे. अफगाणिस्तानसारखा देश रॉकेट हल्ल्यांनी डगमगणार नाही’, अशी घोषणा करून राष्ट्राध्यक्ष गनी यांनी तालिबानच्या रॉकेट हल्ल्यांचा निषेध केला.

गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षावर मात करण्यासाठी आपल्या सरकारने तातडीची आणि व्यावहारिक योजना तयार केल्याचे गनी यांनी जाहीर केले. यासाठी अफगाणींनी पुढील तीन ते सहा महिने एकजूट दाखविण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर देशातील परिस्थिती बदलेल, असा दावा राष्ट्राध्यक्ष गनी यांनी केला. अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी राष्ट्राध्यक्षीय निवासस्थानाजवळ रॉकेट हल्ले चढविणार्‍या तालिबानवर जळजळीत टीका केली.

रॉकेट हल्लेपण राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाजवळ झालेल्या रॉकेट हल्ल्यांशी संबंध नसल्याचा दावा तालिबानचा प्रवक्ता झबिहुल्ला मुजाहिद याने केला. तालिबानने फक्त स्वसंरक्षणाचे धोरण स्वीकारल्याचे मुजाहिद याने आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला सांगितले. पण तालिबानने संघर्षबंदी जाहीर केली का, या प्रश्‍नाला उत्तर देण्याचे मुजाहिदने टाळले. त्यामुळे तालिबानचे अफगाणिस्तानातील हल्ले सुरू राहणार असल्याचे उघड होत आहे. त्याचबरोबर राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाजवळ रॉकेट हल्ले करून तालिबानने अफगाण सरकारला इशारा दिल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत.

अमेरिकेच्या सैन्यमाघारीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अवघ्या काही आठवड्यात तालिबान अफगाणिस्तानचा ताबा घेईल, अशी चिन्हे दिसू लागली होती. पण आता अफगाणी लष्कराचा प्रतिकार तीव्र झाल्याच्या बातम्या येत आहेत. काही ठिकाणी अफगाणी लष्कराने तालिबानच्या हातून भूमी परत मिळविल्याचेही दावे प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे तालिबानला थोपविण्यात आता अफगाणी लष्कर यशस्वी ठरू लागल्याची चर्चा होत आहे. अफगाणिस्तानच्या शहरातील जनता आपल्या भवितव्यासाठी तालिबानबरोबर संघर्ष करण्यास तयार झाल्याच्याही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय जनमत आपल्या बाजूने नाही, याचीही जाणीव तालिबानला झाल्याचे दिसत आहे.

त्यामुळे अफगाणिस्तानातील संघर्षाचे पारडे फिरू लागल्याचे दिसत असताना, तालिबानने अफगाणी राष्ट्राध्यक्षांच्या निवासाजवळ रॉकेट हल्ले चढवून आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केल्याची दाट शक्यता समोर येत आहे. मात्र याचा अपेक्षित परिणाम तालिबानला साधता आलेला नसून अफगाणिस्तानच्या सरकारने या हल्ल्याचा वापर करून उलट तालिबानवरच निशाणा साधल्याचे दिसते आहे.

leave a reply