तालिबानने अफगाणिस्तानला दहशतवादाचे केंद्र बनवू नये

- ओआयसीचा इशारा

दुबई – अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दुसऱ्या देशाच्या विरोधातील दहशतवादी कारवायांसाठी होऊ देणार नाही, असे आश्‍वासन तालिबान देत आहे. मात्र पाकिस्तान व पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटना अफगाणिस्तानातील तालिबानच्या विजयामुळे कमालीच्या उत्तेजित झाल्या आहेत. या दहशतवादी संघटनांचे म्होरके तालिबानवर शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत. तसेच इस्लामधर्मिय देशांमधील दहशतवादी तसेच कट्टरपंथियांच्या संघटना तालिबानकडे आदर्श म्हणून पाहू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत ‘अफगाणिस्तानला जागतिक दहशतवादाचे केंद्र बनू देऊ नका’, असे आवाहन ‘ओआयसी’ने तालिबानला केले.

तालिबानने अफगाणिस्तानला दहशतवादाचे केंद्र बनवू नये - ओआयसीचा इशारा‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन-ओआयसी’ही 57 इस्लामधर्मिय देशांची संघटना आहे. सौदी अरेबियाने रविवारी या संघटनेची विशेष बैठक आयोजित केली होती. या बैठकीत अफगाणिस्तानातील परिस्थितीवर चिंता व्यक्त करण्यात आली. त्याचवेळी अफगाणिस्तानात दहशतवादी संघटनांना पुन्हा पाय रोवू देता येणार नाही, असे सांगून ‘ओआयसी’ने याविरोधात तालिबानला समज दिली आहे. ओआयसीच्या या इशाऱ्याचा तालिबानवर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. तरीही या संघटनेने दिलेला इशारा तालिबानवरील अविश्‍वास व्यक्त करणारा असल्याचे समोर येत आहे. पुढच्या काळात तालिबानसाठी ही फार मोठी समस्या ठरू शकते.

1996 साली तालिबानने अमेरिकेच्या सहाय्याने सोव्हिएत रशियाला माघार घेण्यास भाग पाडून अफगाणिस्तानवर आपली सत्ता प्रस्थापित केली होती. त्यावेळी पाकिस्तानसह सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीने (युएई) तालिबानच्या राजवटीला मान्यता दिली होती. पण आता सौदी व युएईच्या धोरणात फार मोठे बदल झाले आहेत. या देशांना दहशतवाद्यांपासून धोका संभवतो. अशा परिस्थितीत ओआयसीवर नियंत्रण असलेल्या सौदी व युएईने तालिबानला दहशतवादावरून दिलेला इशारा लक्ष वेधून घेत आहे.

leave a reply