तालिबानने चर्चेचा वेग वाढवावा

- अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ

दोहा – तालिबानने अफगाणिस्तानातील हिंसाचारात लक्षणीय घट करावी. त्याचबरोबर अफगाणिस्तानातील सरकारबरोबरील चर्चेचा वेग वाढवून या देशात स्थायी व सर्वसमावेशक संघर्षबंदी लागू करावी, अशी मागणी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी केली.

Advertisement

चर्चेचा वेग

कतारच्या दौर्‍यावर?असताना परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी तालिबानी नेता मुल्ला बरादर याची भेट घेऊन अमेरिकेची भूमिका मांडली. युरोप व आखाती देशांच्या दौर्‍यावर असलेले अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी शनिवारी कतारला भेट दिली. यावेळी पॉम्पिओ यांनी कतारचे राजे आमिर शेख तमिम बिन हमाद अल-थानी यांची भेट घेतली. त्याचबरोबर अफगाणिस्तान सरकारने शांतीचर्चेसाठी नियुक्त केलेले प्रतिनिधी मंडळ तसेच तालिबानच्या नेत्यांची स्वतंत्र भेट घेऊन चर्चा केली.

किमान तासभर पॉम्पिओ आणि तालिबानचा कमांडर मुल्ला बरादर यांच्यात बैठक सुरू होती. पुढच्या काही आठवड्यांमध्ये अमेरिका अफगाणिस्तानातील सैन्यमाघार घेणार आहे. त्याआधी तालिबानने अफगाणिस्तानातील हिंसाचारात घट करावी, राजकीय वाटाघाटींचा वेग तीव्र करावा आणि अफगाणिस्तानात कायमस्वरुपी संघर्षबंदी लागू करावी, अशी मागणी पॉम्पिओ यांनी केल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले. काही तासांपूर्वी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये झालेल्या भीषण रॉकेट हल्ल्यात आठ जणांचा बळी गेला. या व्यतिरिक्त अफगाणिस्तानच्या इतर भागात बॉम्बस्फोटही झाले आहेत.

काबूलमधील रॉकेट हल्ल्यांची जबाबदारी ‘आयएस’ने स्वीकारली असली तरी बॉम्बस्फोटासाठी तालिबान जबाबदार असल्याचा दावा केला जातो.

leave a reply