अफगाणिस्तानात तालिबानच्या दहशतवादी हल्ल्यांचे भीषण सत्र सुरुच

- दोन दिवसात ३१ जणांचा बळी

Afghanistan-Talibanकाबूल – बुधवारी अफगाणिस्तानमध्ये तालिबानने अफगाणी सुरक्षा दलांवर चढविलेल्या हल्ल्यात १७ जवानांचा बळी गेला. तर बुधवारी रात्री अफगाणिस्तानच्या पोलीस दलावरही हल्ला झाला असून यात सात पोलीस ठार झाले. गुरुवारी अफगाणिस्तानच्या ताखर प्रांतात एका शाळेच्या आवारात मॉर्टरचा स्फोट झाला असून यात सात विद्यार्थ्यांचा बळी गेला आहे. तसेच नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी नाटो अफगाणिस्तानच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध असल्याचे तालिबानला बजावले आहे. बुधवारी अफगाणिस्तानच्या जोवजझान प्रांतात तालिबानने सुरक्षा दलाच्या चौकीला लक्ष्य केले. यात १२ अफगाणी जवानांचा बळी गेला. तर या हल्ल्यात पाच तालिबानी देखील ठार झाले आहेत. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. याला काही तास उलटत नाही तोच अफगाणिस्तानच्या कुंदुझ शहरात हल्ला झाला. या शहरातील अफगाणी सुरक्षा दलाच्या चौकीवर हल्ला झाला. यात पाच जवान ठार झाले असून सात जण जखमी झाले आहेत. तर बुधवारी रात्रीच्या सुमारास अफगाणिस्तानच्या बघलान प्रांतात तालिबानने चढविलेल्या हल्ल्यात सात पोलिसांचा बळी गेला.

गेल्या काही दिवसांमध्ये तालिबानने अफगाणी सुरक्षा दलांवर २२० हल्ले चढविले असून यात ४२२ अफगाणी जवानांचा बळी गेला होता. त्यामुळे अफगाणिस्तानातील शांतीप्रकिया निकालात निघाल्याचे दिसत आहे.

नाटोला अफगाणिस्तानात शांतता हवी आहे. अफगाणिस्तानच्या सुरक्षेसाठी नाटो वचनबद्ध असल्याचे जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी तालिबानने अजूनही ‘अल-कायदा’ आणि इतर दहशतवादी संघटनांसोबतचे त्यांचे संबंध तोडलेले नाहीत, याची जाणीव करुन देऊन नाटो प्रमुखांनी तालिबानला सज्जड इशारा दिला. अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित होत नाहीत तोपर्यंत नाटो सैन्यमाघार घेणार नाही, असे नाटोप्रमुखांनी ठासून सांगितले.

leave a reply