तालिबानच्या धमकीमुळे पाकिस्तानात खळबळ

इस्लामाबाद – सैन्यमाघारीनंतरही अफगाणिस्तानवरील नियंत्रण कायम राखण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानात लष्करी तळ उभारण्याची तयारी सुरू केली आहे. या तळाचा वापर करून तालिबानवर हल्ले चढविणे अमेरिकेसाठी सोपे जाऊ शकते. हे लक्षात घेऊन तालिबानने आपल्या पाकिस्तानला यावरून धमकावले आहे. अमेरिकेला तळ देण्याचा निर्णय दुर्दैवी व घातक ठरेल, असा इशारा तालिबानने दिला आहे. तालिबानच्या या धमकीनंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत.

पाकिस्तानात खळबळअधिकृत पातळीवर पाकिस्तानने आपण अमेरिकेला तळ देणार नाही, असे जाहीर केले. पण अमेरिकेच्या लढाऊ विमानांना आपली हद्द वापरू देण्यास पाकिस्तान तयार?झाला आहे. त्याचवेळी अमेरिकेच्या वरिष्ठ नेत्यांनी व अधिकार्‍यांनी परवेझ मुशर्रफ पाकिस्तानचे हुकूमशहा असताना, झालेल्या करारांची पाकिस्तानच्या सरकारला आठवण करून दिली. या करारानुसार पाकिस्तानने आपले लष्करी व हवाई तळ यांचा वापर करण्याची परवानगी अमेरिकेला दिली होती.

या करारामुळे पाकिस्तानच्या सरकारचे हात बांधले गेले आहेत, असा दावा पाकिस्तानी माध्यमे करू लागली आहेत. अशा परिस्थितीत तालिबानकडून आलेली धमकी पाकिस्तानात नव्या दहशतवादी हल्ल्याचे भयंकर सत्र सुरू करील, अशी चिंता पाकिस्तानी माध्यमे व विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत.

अमेरिकेला तळ देणे ही पाकिस्तानच्या सरकारची ऐतिहासिक चूक ठरेल, असे मानणारा कट्टरपंथिय विश्‍लेषकांचा मोठा गट पाकिस्तानात आहे. त्याचवेळी अमेरिका ही मावळती महासत्ता असून उभरती महासत्ता असलेल्या चीनबरोबरील सहकार्य पाकिस्तानसाठी अधिक महत्त्वाचे ठरते, असे या विश्‍लेषकांच्या गटाचे म्हणणे आहे.
म्हणूनच पाकिस्तानने अमेरिकेची लष्करी तळाची मागणी मान्य करून तालिबानसह चीन व रशियासारख्या देशांची नाराजी ओढावून घेऊ नये, असे हा विश्‍लेषकांचा गट सांगत आहे. मात्र अधिकृत पातळीवर कितीही मोठे दावे केले तरी पाकिस्तानसमोर अमेरिकेची मागणी मान्य केल्यावाचून पर्यायच नसल्याचे काही पत्रकार सांगत आहेत.

leave a reply