अफगाणिस्तानातील माघारीवरुन तालिबानचा तुर्कीला नवा इशारा

नवा इशाराकाबुल – वारंवार इशारे देऊनही अफगाणिस्तानातील सैन्यतैनातीवर ठाम राहणार्‍या तुर्कीला तालिबानने नवा इशारा दिला. ‘अफगाणिस्तानच्या जमिनीवर तुर्कीच्या जवानांचे पाऊल खपवून घेणार नाही’, असे तालिबानने धमकावले. तर अफगाणिस्तानात तळ मिळवून देण्यासाठी अमेरिकेने सहाय्य करावे, अशी मागणी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी केली आहे.

दोन दिवसांपूर्वी रशियन वृत्तसंस्थेशी बोलताना, तालिबानचा प्रवक्ता झबिहुल्ला मुजाहिद याने पुन्हा एकदा अफगाणिस्तानातील तुर्कीच्या सैन्यतैनातीला विरोध केला. ‘अफगाणिस्तानातील शांतता आणि विकासासाठी राजनैतिक स्तरावर तुर्कीने दिलेल्या सहाय्याचा स्वीकार केला जाईल. पण अफगाणिस्तानातील तुर्कीच्या जवानांची तैनाती खपवून घेणार नाही’, असे मुजाहिद याने धमकावले.

अफगाणिस्तानची राजधानी काबुलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेसाठी आपले जवान तैनात करणार असल्याचे तुर्कीने जाहीर केले. पण नाटोचा सदस्य असलेल्या तुर्कीने आपल्या सहकारी देशांबरोबर अफगाणिस्तानातून माघार घ्यावी. इस्लामी देश असला तरी अफगाणिस्तानातील युद्धात पाश्‍चिमात्य देशांसह लढणार्‍या तुर्कीने आपला एकही जवान मागे सोडू नये, असे तालिबानने याआधी तुर्कीला फटकारले होते.

दरम्यान, पाकिस्तान तालिबानला नियंत्रित करीत असल्याचा आरोप केला जातो. त्यामुळे अफगाणिस्तानातील आपल्या सैन्यतैनातीच्या विरोधात तालिबानने स्वीकारलेल्या या भूमिकेमागे देखील पाकिस्तान असल्याची शक्यता तुर्कीतील काही पत्रकार वर्तवू लागले आहेत.

leave a reply