तालिबान लवकरच पाकिस्तानचा ताबा घेईल

- तालिबानच्या दहशतवाद्यांची धमकी

काबुल – ‘पाकिस्तानात बाहुले सरकार आहे. या सरकारने अमेरिकेला लष्करी तळ पुरविले होते. त्याचबरोबर नाटोच्या साथीने आमच्या विरोधातील संघर्षात पाकिस्तानने सहभाग घेतला होता. यापुढे असे काही होऊ दिले जाणार नाही. कारण लवकरच पाकिस्तानातील बाहुले सरकार बदलून या देशातही अफगाणिस्तानप्रमाणे तालिबानची राजवट प्रस्थापित होईल’, अशी धमकी तालिबानच्या दहशतवाद्यांनी दिली. काही दिवसांपूर्वीच, पाकिस्तानची अण्वस्त्रे तालिबानच्या हाती पडण्याचा धोका संभवतो, असा इशारा अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी दिला होता. तालिबानची पावले या दिशेने पडू लागल्याचे या धमकीवरून स्पष्ट होत आहे.

तालिबान लवकरच पाकिस्तानचा ताबा घेईल - तालिबानच्या दहशतवाद्यांची धमकीअफगाणिस्तानच्या परवान प्रांतातील तालिबानी दहशतवाद्यांचा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहे. अफगाणिस्तानातील लोकशाही सरकार उलथून तालिबानची राजवट प्रस्थापित करण्यात यशस्वी ठरल्याचा दावा एक दहशतवादी करीत आहे. ‘फक्त अफगाणिस्तानच नाही तर पाकिस्तानातही अशाच प्रकारे तालिबानची राजवट आणली जाईल. यासाठी पाकिस्तानवर हल्ले चढविले जातील’, असे सांगून सदर दहशतवाद्याने पाकिस्तानात आत्मघाती स्फोट घडविण्याचा दावा केला.

तर दुसर्‍या दहशतवाद्याने पाकिस्तानातील सध्याचे सरकार धर्मद्रोही असल्याचा दावा केला. म्हणूनच हे सरकार उधळून लावण्यासाठी लवकरच पाकिस्तानातही युद्ध पुकारले जाईल, अशी धमकी या दहशतवाद्याने दिली. काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमेवर तैनात असलेल्या तालिबानच्या दहशतवाद्याने ‘लवकरच तुमचा नंबर आहे’, अशी धमकी सीमेवर तैनात असलेल्या पाकिस्तानी जवानाला दिली होती. याआधी अफगाणिस्तान-पाकिस्तानची विभागणी करणारी ड्युरंड लाईन सीमा मान्य करीत नसल्याची घोषणा तालिबानच्या एका गटाने केली होती.तालिबान लवकरच पाकिस्तानचा ताबा घेईल - तालिबानच्या दहशतवाद्यांची धमकी

अफगाणिस्तानप्रमाणे आपल्या देशातही तालिबानची राजवट प्रस्थापित व्हावी, अशी मागणी पाकिस्तानातील धार्मिक नेते उघडपणे करीत आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये मौलाना अब्दुल अझिज याने तालिबानचे झेंडे फडकावून पाकिस्तानी पोलिसांना तालिबानची धमकी दिली होती. पाकिस्तानातील या घडामोडींवर आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकांनी चिंता व्यक्त केली होती.

तालिबानची वकिली करणार्‍या पाकिस्तानचा लवकरच तालिबान व इतर दहशतवादी संघटना ताबा घेतील, असे या विश्‍लेषकांनी बजावले होते. तर एकदा पाकिस्तान तालिबानच्या ताब्यात गेला की या देशाकडे असलेली सुमारे १५० अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती पडतील, असा इशारा अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बोल्टन यांनी दिला होता.

leave a reply