भारत व तालिबानमध्ये चर्चा पार पडली

दोहा – तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर, पहिल्यांदाच भारताची तालिबानबरोबर चर्चा पार पडली. कतारमधील भारताचे राजदूत दीपक मित्तल यांची तालिबानचा नेता शेर मोहम्मद स्तानेकझई याने भेट घेतली. अफगाणिस्तानच्या भूमीचा भारताच्या विरोधात वापर केला जाणार नाही, अशी ग्वाही यावेळी स्तानेकझई याने दिली. तर अफगाणिस्तानातील भारतीय तसेच या देशातील अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेचा मुद्दा यावेळी भारताच्या राजदूतांनी उपस्थित केला. त्यावरही तालिबानच्या नेत्याने भारताला आश्‍वस्त करण्याचा प्रयत्न केला. तालिबानला भारताबरोबर उत्तम सहकार्य हवे आहे, हे स्तानेकझई याने आवर्जुन सांगितले.

तालिबानने केलेल्या विनंतीनुसार भारताचे कतारमधील राजदूत दीपक मित्तल तालिबानचे नेते शेर मोहम्मद स्तानेकझई यांची भेट घेतल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. कतारच्या दोहा येथे तालिबानचे अधिकृत कार्यलय असून स्तानेकझई त्याचे प्रमुख आहेत. भारतीय राजदूतांबरोबरील भेटीत स्तानेकझई याने अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर भारतविरोधी कारवाया तसेच दहशतवादासाठी होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही दिली. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांचे म्होरके तालिबानच्या संपर्कात असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा अफगाणिस्तान भारतविरोधी दहशतवादी कारवायांचे केंद्र बनेल, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत स्तानेकझई याने दिलेली ग्वाही महत्त्वपूर्ण ठरते.

1982 साली भारतात लष्करी प्रशिक्षण घेतलेल्या स्तानेकझई याने याआधीही तालिबानपासून भारताला धोका नसल्याचे जाहीर केले होते. दरम्यान, अफगाणिस्तानातील भारतीय तसेच या देशातील धार्मिक अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू व शीखधर्मियांच्या सुरक्षेबाबत स्तानेकझई याने भारताला आश्‍वासन दिले आहे. भारताने अफगाणिस्तानातील आपले विकसप्रकल्प पूर्ण करो, अशी मागणी तालिबानने याआधी केली होती. भारत हा या क्षेत्रातला अत्यंत महत्त्वाचा देश आहे आणि अफगाणिस्तानसाठी भारत खूपच महत्त्वाचा ठरतो, असे स्तानेकझई याआधी म्हणाला होता.

तालिबानपासून भारताच्या सुरक्षेला धोका नसेल व भारताच्या हितसंबंधांच्या विरोधात न जाण्याची भूमिका तालिबानने स्वीकारली, तर ती भारतासाठी अतिशय सकारात्मक बाब ठरेल. यामुळे पाकिस्तानची कारस्थाने हाणून पाडणे सोपे जाईल, असा दावा काही विश्‍लेषक करीत आहेत. म्हणून तालिबानशी चर्चा करण्याची भूमिका भारताने स्वीकारावी, असा या विश्‍लेषकांचा आग्रह आहे. तर काही विश्‍लेषक मात्र तालिबानबाबत अधिक सावधपणा दाखविण्याची गरज असल्याचे सुचवित आहेत.

leave a reply