भिवंडीमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दहा जण ठार

भिंवडी – ठाणे जिल्ह्यातील भिंवडीमध्ये तीन मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दहा जणांचा बळी गेला, तर नऊ जण जखमी झालेआहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस व एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि युध्द पातळीवर बचावकार्य सुरू केले. इमारतीच्या ढिगाऱ्याखालून २५ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. अजुनही इमारतीच्या ढिगार्‍याखाली २० ते २५ जण अडकल्याची भिती व्यक्त केली जाते.

भिवंडीतील धामणकर नाक्याजवळच्या पटेल कम्पाऊंड भागात ‘जिलानी’ नावाची इमारत सोमवारी पहाटे ३ वाजून ४५ मिनिटांनी कोसळली. यावेळी बहुतांश रहिवासी झोपेत होते. या दुर्घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण ही इमारत ४३ वर्ष जुनी होती आणि धोकादायक होती, असे सांगितले जात आहे. या तीन मजली इमारतीत ४० फ्लॅट्समध्ये १५० हून अधिक रहिवाशी राहत होते, अशी माहिती भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

इमारत कोसळली तेव्हा परिसरातील सतर्क नागरिकांमुळे २० जणांना इमारतीच्या ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात आले. सकाळी नऊ वाजेपर्यंत दहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. भिवंडीत रविवारपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत.

इमारत दुर्घटनेबाबत नारपोली पोलीस ठाण्यात इमारतीचा मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .भिवंडी येथील इमारत दुर्घटनेबद्दल पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुःख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना प्रकट केल्या आहेत. सरकारतर्फे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

leave a reply