अमेरिका व इराणमधील तणाव वाढला – तणावामुळे इंधन व सोन्याचे दर वाढले

अमेरिका व इराणमधील तणाव वाढला – तणावामुळे इंधन व सोन्याचे दर वाढले

तेहरान/वॉशिंग्टन – पर्शियन आखातातून प्रवास करणाऱ्या अमेरिकेच्या जहाजांना इराणकडून कुठल्याही प्रकारे त्रास झाला तर, इराणच्या सगळ्या गस्तिनौका बेचिराख करुन टाका, असे थेट आदेश राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी नौदलाला दिले. यामुळे खवळलेल्या इराणने अमेरिकेच्या युद्धनौकांना जलसमाधी देण्याची धमकी दिली आहे. दरम्यान, अमेरिका आणि इराणमधील या तणावानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाच्या दरात वाढ नोंदविण्यात आली असून सोन्याचे दरही वाढले आहेत.

‘यापुढे अमेरिका इराणच्या बेजबाबदार कारवाया कदापि खपवून घेणार नाही. तोफांनी सज्ज असलेल्या इराणच्या गस्तिनौकांमुळे आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीतून प्रवास करणारी अमेरिकेची जहाजे किंवा नौसैनिकांना धोका निर्माण झाला तर इराणच्या या गस्तिनौका अस्तित्वातच ठेवणार नाही’, अशी घोषणा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी बुधवारच्या पत्रकार परिषदेत केली. गेल्या आठवड्यात इराणच्या ११ गस्तिनौकांनी अमेरिकी जहाजाच्या जवळून धोकादायक प्रवास केला होता. त्यावर अमेरिकेकडून ही प्रतिक्रीया उमटली.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नौदलाला दिलेले हे आदेश इराणसाठी सुस्पष्ट इशारा असल्याची माहिती पेंटॅगॉनने दिली. याआधीपासून अमेरिकेच्या युद्धनौका पर्शियन आखातात तैनात असून आपल्या हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी लष्करी कारवाई करण्याची अमेरिकी नौदलाला परवानगी आहे. पण राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकी नौदल अधिक सक्रिय झाल्याचे पेंटॅगॉनने म्हटले आहे.

पर्शियन आखातात अमेरिकेच्या १५ युद्धनौका तैनात आहेत. यामध्ये ‘युएसएस ड्विट आयसेनहॉवर’ या विमानवाहू युद्धनौकेसह ‘युएसएस बॅटन’ या अॅम्फिबियस युद्धनौकेचा समावेश आहे. तर पर्शियन आखातातील सागरी क्षेत्रात अमेरिकेला आव्हान देणाऱ्या इराणच्या नौदलात छोटी मोठी अशा किमान १८ हजार जहाजे आहेत. यामध्ये छोट्या पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या २५ हून अधिक नौका तर मशिनगन्सनी सज्ज असलेल्या ६०० हून अधिक गस्तिनौकांचा समावेश आहे.

इराणच्या या वेगवान युद्धनौकांकडून अमेरिका व इतर मित्रदेशांच्या जहाजांचा पाठलाग तसेच अपहरण केल्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. जगभरातील ३३ टक्के इंधानाची वाहतुक या सागरी क्षेत्रातून केली जाते. अशा परिस्थितीत इराणच्या आक्रमक कारवायांमुळे पर्शियन आखातात तणाव निर्माण होऊन इंधनाचे दर काही काळासाठी वाढले होते. आता देखील अमेरिका आणि इराणमधील तणावानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाच्या दरात वाढीची नोंद झाली आहे. तसेच यामुळे सोन्याचीही दरवाढ झाली आहे.

leave a reply