इराकमधील लष्करी कारवाईवरुन तुर्की व इराणमध्ये तणाव

- दोन्ही देशांनी राजदूतांना समन्स बजावले

लष्करी कारवाईअंकारा/तेहरान – अमेरिका, इस्रायल व सौदी अरेबिया यांच्या विरोधात इराण व तुर्कीने एकजूट केली होती. याला आता तडे जाऊ लागल्याचे दिसत आहे. तुर्कीच्या लष्कराची इराकमधील तैनाती आणि लष्करी कारवाई खपवून घेणार नसल्याचे इराणने बजावले आहे. तर आपल्या देशात ५२५ दहशतवाद्यांना आश्रय देणार्‍या इराणने तुर्कीला दहशतवादविरोधी कारवायांवर व्याख्याने देऊ नये, असे तुर्कीने फटकारले आहे. यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजदूतांना समन्स बजावल्याचे वृत्त आहे.

आठवड्याभरापूर्वी इराकमधील दहशतवादी हल्ल्यात १३ जणांचा बळी गेला होता. यामध्ये तुर्कीच्या १२ जवान, गुप्तहेरांचा तसेच इराकच्या एका नागरिकाचाही समावेश होता. या हल्ल्यासाठी कुर्द दहशतवादी जबाबदार असल्याचा आरोप करून तुर्कीने इराकच्या सीमाभागात लष्करी कारवाई केली होती. तसेच तुर्कीने आपले जवान, रणगाडेही इराकच्या उत्तरेकडील सीमाभागात तैनात केल्याचा दावा केला जातो. तुर्कीच्या या लष्करी कारवाईवर इराकचा शेजारी देश असलेल्या इराणने आक्षेप घेतला. ‘तुर्की किंवा कुठल्याही इतर देशाने इराकमध्ये लष्करी हस्तक्षेप करून किंवा सैन्यतैनाती लष्करी कारवाईइराण अजिबात खपवून घेणार नाही. तुर्कीची सैन्यतैनाती इराकच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे’, अशी टीका इराकमधील इराणचे राजदूत इराज मस्जिदी यांनी केली.

त्याबरोबर इराकमधील तुर्कीचे राजदूत फतिह यिल्दीझ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून इराणच्या राजदूतांवर ताशेरे ओढले. इराकच्या सीमेचा आदर करण्यावरुन तुर्कीला व्याख्यान देण्याचा अधिकार इराणला असूच शकत नाही, असा टोला यिल्दीझ यांनी लगावला.

‘दहशतवादविरोधी युद्धात इराण तुर्कीच्या सोबत आहे, असे वाटत होते. पण इराणनेे ५२५ कुर्द दहशतवाद्यांना आसरा दिलेला आहे’, असा आरोप इराणमधील तुर्कीचे राजदूत देर्या ओर्स यांनी केला. या जोरदार शाब्दिक चकमकीनंतर तुर्की व इराणने एकमेकांच्या राजदूतांना समन्स बजावले आहेत.

दरम्यान, इराकमधील लष्करी कारवाई आणि सैन्यतैनाती ही कुर्दांच्या विरोधात असल्याचे तुर्की सांगत आहे. मात्र ते खरे नसून तुर्कीचा इराकमधील इंधनसंपन्न मोसूल प्रांतावर डोळा आहे व हा प्रांत ताब्यात घेऊन तुर्कीला ऑटोमन साम्राज्य प्रस्थापित करण्याच्या दिशेने पावले टाकायची आहेत, असा आरोप आखातातील माध्यमे करीत आहेत.

leave a reply