लडाखच्या एलएसीवर भारत-चीनमध्ये चर्चेची दहावी फेरी सुरू

नवी दिल्ली – लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी भारत व चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांमधील चर्चेची १० वी फेरी सुरू झाली आहे. पँगाँग सरोवर क्षेत्राच्या उत्तर व दक्षिणेकडील भागातून दोन्ही देशांच्या सैन्यमाघारीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पण अजूनही हॉट स्पिंग्ज्, गोग्रा आणि डेप्सांग या पूर्व लडाखच्या एलएसीवर दोन्ही देशांचे सैनिक तैनात आहेत. इथल्या माघारीवर दोन्ही देशांचे लष्करी अधिकारी चर्चा करीत आहेत. दरम्यान, लडाखच्या एलएसीवरील परिस्थिती निवळत असली तरी सिक्कीम येथील चीनलगतच्या सीमेवर भारतीय वायुसेनेने अपाचे हेलिकॉप्टर्स तैनात केल्याच्या बातम्या आल्या आहेत.

शनिवारी लडाखच्या एलएसीवरील माल्दो इथे भारत व चीनच्या लष्करी अधिकार्‍यांची चर्चा सुरू झाली. या चर्चेचे सारे तपशील अद्याप उघड झालेले नाहीत. पण हॉट स्पिंग्ज्, गोग्रा आणि डेप्सांग येथूनही उभय देशांच्या सैन्यमाघारीचा मुद्दा या चर्चेत अग्रस्थानी असल्याचे दावे केले जातात. या ठिकाणाहून उभय देशांचे सैनिक माघारी परतल्यानंतरच लडाखच्या एलएसीवरील तणाव निवळल्याचे खात्रीने सांगता येईल, असे सामरिक विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. त्याचवेळी चीन एलएसीवर नव्याने घुसखोरी करून भारताचा विश्‍वासघात करण्याची शक्यता सामरिक विश्‍लेषकांकडून नाकारली जात नाही.

चीननेही लडाखमधून सैन्यमाघार घेत असताना, गलावनमधील संघर्षाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या संघर्षात आपले पाच अधिकारी व जवान ठार झाल्याचे मान्य करून चीनने हा व्हिडिओ प्रसिद्ध केला. यानंतर चीनच्या सोशल मीडियावर भारताच्या विरोधात जोरदार टीका सुरू झालेली आहे. चीनचा सोशल मीडिया असलेल्या वायबोवर भारताच्या विरोधात तिरस्काराने भरलेले विद्वेषी संदेश येत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत चीनच्या लष्कराने लडाखच्या एलएसीवरून सैन्यमाघारीची तयारी केलेली असली तरी चीनचे भारताबाबतचे धोरण बदललेले नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

गलवान खोर्‍यातील संघर्षाबाबत खोटी माहिती देऊन भारतीय माध्यमे चिनी लष्कराचा अवमान करीत असल्याचा आरोप ‘पिपल्स डेली’ चिनी लष्कराच्या दैनिकाने केला आहे. गलवानच्या संघर्षात चीनचे ४५ किंवा त्याहूनही अधिक जवान ठार झाल्याचे दावे भारतीय माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. आंतरराष्ट्रीय समुदायाला खोटी माहिती देऊन भारतीय माध्यमे चीनच्या लष्कराची बदनामी करीत असल्याचा आरोप या दैनिकाने केला. गलवानच्या संघर्षात आपण भारतापेक्षा अधिक संख्येने जवान गमावले, ही बातमी चीनला अस्वस्थ करीत असल्याचे यामुळे उघड?झाले आहे. सध्या चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या देशाच्या लष्करी सामर्थ्यात वाढ करण्याचे आक्रमक धोरण स्वीकारले आहे. गलवानमधील संघर्षात चीनकडून आपल्या लष्करी सामर्थ्याबाबत केल्या जाणार्‍या दाव्यांचा फुगा फुटला आहे. त्यामुळे चीनकडून अशा प्रतिक्रिया येत असल्याचे दिसते.

दरम्यान, चीन लडाखच्या एलएसीवरून घ्याव्या लागलेल्या माघारीची भरपाई करण्यासाठी एलएसीच्या इतर भागात घुसखोरी करू शकतो, याची पूर्ण जाणीव भारतीय संरक्षणदलांना आहे. म्हणूनच सिक्कीमच्या एलएसीवर भारतीय वायुसेनेने अपाचे हेलिकॉप्टर्स तैनात केल्याचे वृत्त आहे.

अमेरिकेकडून खरेदी केलेली अपाचे ही अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स असून एलएसीवरील त्यांची तैनाती म्हणजे चीनला देण्यात आलेला सज्जड इशारा असल्याचे दिसते. त्याचवेळी भारतीय लष्कराची ‘के९ वज्र’ तोफा देखील एलएसीवर तैनात करण्यात आल्या आहेत. ‘लार्सन अँड टुब्रो’ कंपनीने तयार केलेल्या या तोफांचे रणगाड्यात रुपांतर करण्याची योजना असल्याचे दावे केले जातात.

leave a reply