सलग तिसर्‍या दिवशी अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ला

- नऊ जणांचा बळी, जखमींची संख्या २० वर

दहशतवादी हल्लाकाबुल – सलग तिसर्‍या दिवशी अफगाणिस्तानात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये ९ जणांचा बळी गेला तर २० जण जखमी झाले. जखमींमध्ये अफगाणिस्तानच्या संसद सदस्यांचाही समावेश आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुणीही स्वीकारलेली नाही. गेल्या तीन महिन्यांपासून अफगाणिस्तानात सुरू असलेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये ४८० हून अधिक अफगाणी नागरिकांचा बळी गेला आहे. अफगाणिस्तानच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने या हल्ल्यांसाठी तालिबानला जबाबदार धरले आहे.

रविवारी सकाळी अफगाणिस्तानची राजधानी काबुलसह लोगार, नानंगरहार, हेल्मंड आणि बडाखशान या प्रांतात बॉम्ब स्फोट झाले. यापैकी काबुलमधील कारबॉम्बस्फोट अफगाणी संसद सदस्य ‘खान मोहम्मद वरदाक’ यांना लक्ष्य करून घडविण्यात आला होता. खोशाल खान भागात वरदाक यांची मोटार येताच स्फोटकांनी भरलेल्या कारचा मोठा स्फोट झाला. या स्फोटात नऊ जणांचा बळी गेला असून यामध्ये महिला, मुलं आणि वृद्धांचा समावेश आहे. संसद सदस्य वरदाक या हल्ल्यात जखमी झाले आहेत.

दहशतवादी हल्ला

गेल्या काही दिवसांपासून अफगाणी लोकप्रतिनिधी, जवान आणि निष्पाप नागरिकांवरील दहशतवादी हल्ले वाढले आहेत. अफगाणिस्तानच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाचे प्रवक्ते तारीक अरियान यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यात तालिबानने ३८ आत्मघाती हल्ले चढविले तर ५०७ बॉम्बस्फोट केले आहेत. यामध्ये ४८७ हून अधिक जणांचा बळी गेला तर हजाराहून अधिक जण जखमी झाले आहेत. निष्पाप नागरिकांची हत्या करून तालिबान युद्धगुन्हे करीत असल्याची टीका प्रवक्ते अरियान यांनी केली.

दहशतवादी हल्ला

दोन दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल गनी यांनी तालिबानच्या हल्ल्यांवर टीका केली होती. अफगाणी जनतेला शांतता हवी असल्याचे सत्य तालिबानने स्वीकारावे आणि मानवतेविरोधातील हे हल्ले थांबवावे, असे आवाहन अफगाणी राष्ट्राध्यक्षांनी केले होते. कतारमधील तालिबानबरोबरच्या वाटाघाटींना काही दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत, तालिबानच्या हल्ल्यांमध्ये होत असलेली वाढ आणि त्यावर अफगाण सरकारकडून होणारे आरोप या वाटाघाटींसाठी अडचणी ठरू शकतात.

दरम्यान, अमेरिका व नाटो लष्कराचे संयुक्त कमांडर जनरल स्कॉट मिलर यांनी तालिबान स्वतःच्या फायद्यासाठी हिंसाचाराचा वापर करीत असून त्यांना हिंसेचा मार्ग सोडायचाच नाही, असा ठपका ठेवला आहे.

leave a reply