शेजारी देशांमधील दहशतवाद्यांची आश्रयस्थाने नष्ट झाल्यानंतरच अफगाणिस्तानात शांती नांदेल

- सुरक्षा परिषदेत भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांचा पाकिस्तानवर प्रहार

संयुक्त राष्ट्रसंघ – अफगाणिस्तानातील दहशतवाद व रक्तपात याला पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे ‘सुरक्षित स्वर्ग’ कारणीभूत असल्याचे भारताने ठासून सांगितले. थेट नामोल्लेख न करता भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत पाकिस्तानवर हा प्रहार केला. त्याचवेळी अफगाणिस्तानची व्यापारी वाहतूक रोखून पाकिस्तान या देशाची आर्थिक कोंडी करीत आहे, ही बाब देखील परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सुरक्षा परिषदेच्या निदर्शनास आणली.

शेजारी देशांमधील दहशतवाद्यांची आश्रयस्थाने नष्ट झाल्यानंतरच अफगाणिस्तानात शांती नांदेल - सुरक्षा परिषदेत भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांचा पाकिस्तानवर प्रहारसंयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत ‘युएन असिस्टन्स मिशन इन अफगानिस्तान-युएनएएमए’वर चर्चा सुरू होती. यावेळी भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अफगाणिस्तानातील हिंसाचार व अस्थैर्य यांचे केंद्र पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या सुरक्षित स्वर्गामध्ये असल्याचे स्पष्ट केले. नामोल्लेख टाळून जयशंकर यांनी पाकिस्तान आपल्या सीमेतून अफगाणिस्तानात ‘दहशतवादाची निर्यात’ करीत असल्याचा आरोप केला. त्यामुळे अफगाणिस्तानात कायमस्वरुपी शांती हवी असेल, तर सीमेपलिकडील दहशतवाद्यांची सुरक्षित आश्रयस्थाने नष्ट करावीच लागतील. तसेच कुठल्याही प्रकारचा दहशतवाद खपवून न घेण्याचे धोरण स्वीकारावे लागेल आणि यात सीमेपलिकडच्या दहशतवादाचाही समावेश आहे, असे जयशंकर यांनी परखडपणे बजावले.

अफगाणिस्तानच्या भूमीचा इतर देशांच्या विरोधातील दहशतवादी कारवायांसाठी वापर केला जाऊ नये. यासाठी जे दहशतवाद्यांना पैसे व इतर प्रकारचे सहाय्य पुरवित आहेत, त्यांना यासाठी जबाबदार धरायलाच हवे. आंतरराष्ट्रीय समुदायाने अफगाणिस्तानबाबत आपल्या विविध संस्थांमार्फत यासाठी आवश्यक ती बांधिलकी दाखवायलाच हवी’, अशी अपेक्षा भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. याबरोबरच अफगाणिस्तानच्या आर्थिक विकासाच्या मार्गातील पाकिस्तान हा फार मोठा अडथळा बनला आहे, याकडेही परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी लक्ष वेधले.

अफगाणिस्तानला बंदर उपलब्ध नाही. त्यामुळे व्यापारी वाहतुकीसाठी अफगाणिस्तान पाकिस्तानच्या बंदरांवर अवलंबून आहे. तसेच रस्त्यांच्या मार्गाने होणारा अफगाणिस्तानचा व्यापारही पाकिस्तानने रोखून धरलेला आहे. अफगाणिस्तानचा आर्थिक विकास हवा असेल, तर ही कोंडी फोडणे भाग आहे, याची जाणीव परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी करून दिली. सध्या अफगाणिस्तानात लष्कर व तालिबानचा घनघोर संघर्ष सुरू आहे. त्यामुळे वाटाघाटींनी अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता निकालात निघाली आहे. मात्र अफगाणींनीच सुरू केलेली व त्यांचेच नियंत्रण असलेली शांतीप्रक्रियाच अफगाणिस्तानात खर्‍या अर्थाने शांतता व स्थैर्य प्रस्थापित करील, असा विश्‍वास जयशंकर यांनी व्यक्त केला. पाकिस्तानसारखा देश या शांतीप्रक्रियेत खोडा घालत असल्याचा ठपका याद्वारे भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ठेवला आहे.

याआधीही अफगाणिस्तानच्या समस्येचे मूळ पाकिस्तानात असल्याचे भारताने वारंवार बजावले होते. अफगाणिस्तानचे सरकार यासाठी पाकिस्तानवर सडकून टीका करीत आहे. अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री हनीफ अत्मर यांनी पाकिस्तानकडून भारतात दहशतवादी कारवाया करणार्‍या ‘लश्कर-ए-तोयबा’ आणि इतर दहशतवादी संघटनांना तालिबान सहाय्य करीत असल्याचा ठपका ठेवला आहे. हे सारे पाकिस्तानच्या पाठिंब्याखेरीज शक्य नसल्याचे संकेत अफगाणी सरकारकडून दिले जात आहेत. भारत तालिबानशी चर्चा करीत असल्याच्या बातम्या येत असताना, अफगाणिस्तानच्या सरकारकडून तालिबानवर केले जाणारे हे आरोप लक्षवेधी ठरतात.

leave a reply