जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून पाच दिवसात सातजणांची हत्या

- पाकिस्तानच्या इशार्‍यावर शांती व सौहार्द बिघडविण्याचे दहशतवाद्यांचे कारस्थान - जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग

श्रीनगर/नवी दिल्ली – गुरुवारी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी एका शाळेत घुसून दोन शिक्षकांची हत्या केली. मंगळवारीच दहशतवाद्यांनी एका काश्मिरी पंडितासह तीन जणांची हत्या केली होती. तर गेल्या पाच दिवसात सात जणांना दहशतवाद्यांनी ठार केले. या हत्येनंतर जम्मू-काश्मीरमध्ये देशभरातून तीव्र संताप होत आहे. पाकिस्तानकडून १९९० सारखी परिस्थिती निर्माण करण्यासाठी सातत्याने कट रचला जात असल्याचे, तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनीही सीमेपलिकडून अशा हल्ल्यांसाठी दहशतवाद्यांना सूचना मिळत असल्याचे व काश्मीरमध्ये एकोप्याचे वातावरण बिघडविण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. मात्र हा कट यशस्वी होऊ देणार नाही, असेही दिलबाग सिंग यांनी ठणकावले. या बळींच्या कुटुंबियांच्या अश्रूंची किंमत दहशतवाद्यांना मोजावीच लागेल, असे जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी म्हटले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून पाच दिवसात सातजणांची हत्यागुरुवारी सकाळी साडे अकराच्या सुमारात दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर येथील सफाकदल भागात असलेल्या गर्व्हमेंट बॉईज हायस्कूलमध्ये घुसून येथील दोन शिक्षकांवर गोळ्या झाडल्या. दहशतवाद्यांनी शाळेत घुसून अल्पसंख्याक समुदायाच्या दोन शिक्षकांना इतर शिक्षकांपासून वेगळे काढून ही हत्या केली. यामध्ये श्रीनगरमधील अलोची बाग भागात राहणार्‍या सुपविंदर कौर या शिक्षिकेचा सामावेश आहे. तर दिपक चंद असे दहशतवाद्यांनी हत्या केलेल्या दुसर्‍या शिक्षकांचे नाव आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलांच्या मोहिमांमुळे दहशतवाद्यांना मोठ्या दहशतवादी घटना घडवून आणणे शक्य होत नाही. त्यामुळे गेल्या काही महिन्यात पिस्तूलासारख्या छोट्या शस्त्रांचा वापर हल्ल्यांसाठी वाढला आहे. गोळीबार करून पळून जाण्याची कार्यपद्धती दहशतवादी अवलंबत आहेत. विशेषत: येथील अल्पसंख्यांक समुदायाला दहशतवाद्यांकडून लक्ष्य केले जात आहे. त्यांच्या धार्मिक स्थळांवर हल्ले केले होत आहेत.

जम्मू-काश्मीरमधून विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या संपत्तीवरून कब्जा हटविला जात आहे. तसेच नव्या रहिवाशी कायद्यांमुळे जम्मू-काश्मीरमध्ये वर्षानुवर्ष राहत असलेल्या नागरिकांनाही मिळत असलेल्या रहिवाशी दाखले यामुळे पाकिस्तान व फुटीरांची अस्वस्थता वाढली आहे. तसेच काश्मीरमध्ये वाढत असलेली गुंतवणूक, वाढलेली पर्यटकांची संख्या, यातून वाढता रोजगार यामुळे येथील परिस्थिती पूर्णपणे स्थिरस्थावर होईल व जम्मू-काश्मीरचा प्रश्‍न कायमचा निकालात निघेल, अशी धास्ती पाकिस्तानला सतावत आहेत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून पाच दिवसात सातजणांची हत्यात्यामुळे येथील परिस्थिती बिघडविण्यासाठी व काश्मीर खोर्‍यात पुन्हा परतत असलेल्या विस्थापितांच्या मनात दहशत निर्माण करण्याचे षडयंत्र आखले जात असल्याचा दावा तज्ज्ञ करीत आहेत. १९९०च्या दशकात याच पद्धतीने काश्मिरी पंडितांच्या हत्या करण्यात येत होत्या. यामुळे जीव वाचविण्यासाठी हजारो काश्मिरी पंडितांना आपले मूळ ठिकाण सोडून आपला जमीनजुमला व इतर मालमत्ता मागे ठेवून येथून पलायन करावे लागले होते.

दरम्यान, सकाळी सफाकदल भागात शाळेत झालेल्या हल्ल्यानंतर गुरुवारी रात्री याच भागातील सीआरपीएफच्या छावणीवरही ग्रेनेड हल्ला झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी गेल्या काही दिवसांतील या घटना दु:खद असल्याचे म्हटले आहे. याला जोरदार प्रत्युत्तर देऊ. कोणालाही सोडण्यात येणार नाही. मृतांच्या कुटुंबियांच्या अश्रूंची किंमत चुकती करावीच लागेल, असे सिन्हा यांनी बजावले आहे. तसेच जम्मू-काश्मीरमधील शांती, प्रगती आणि भरभराट रोखण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असेही सिन्हा यांनी ठामपणे सांगितले. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी असे हल्ले करुन येथील स्थानिकांना बदनाम करण्याचे येथील एकोपा बिघडविण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे म्हटले आहे. तसेच दहशतवाद्यांना सीमेपलिकडून काश्मीरमधील शांतता बिघडविण्यासाठी सूचना मिळत असून जम्मू-काश्मीरची जनता हा डाव यशस्वी होऊ देणार नाही. आपण एकजुटीने राहू व त्याच्या उद्देशात त्यांना अपयशी करू, असे आवाहन दिलबाग सिंग यांनी केले आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक

देशातील अंतर्गत सुरक्षा परिस्थिती, ड्रोन बाबतचे धोरण आणि जम्मू-काश्मीर या विषयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवलही उपस्थित होते. जम्मू-काश्मीरमध्ये निवडक समुदायाच्या हत्येच्या घटना घडत असताना या बैठकीचे महत्त्व वाढले आहे.

गुरुवारी दुपारी ही उच्चस्तरीय बैठक पार पडली. अडीच तास ही बैठक सुरू होती. केंद्रीय गृहमंत्री व राष्ट्रीय सुरक्षा सल्लांगारांसह, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, आयबीचे संचालक अरविंद कुमार, बीएसएफ, सीआरपीएफचे वरीष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. ही बैठक नियमित होणारी सुरक्षाविषयक बैठक असल्याचे गृहमंत्रालयाने म्हटले असले, तरी जम्मू-काश्मीरमधील घटनांच्या पार्श्‍वभूमीवर याकडे पाहिले जात आहे.

leave a reply