बीसीसीआयच्या दणक्याने पाकिस्तानची ‘केपीएल’ कोलमडली

नवी दिल्ली – ‘काश्मीर प्रिमिअर लीग’ची घोषणा करून पाकिस्तानने यात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या क्रिकेटपटूंना उतरविण्याची तयारी केली होती. दक्षिण आफ्रिकेचा हर्षल गिब्ज, इंग्लंडच्या मॉन्टी पानेसर, श्रीलंकेचा माजी कर्णधार तिलकरत्ने दिलशान यांचा या यादीत समावेश होता. पण भारताच्या क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पाकिस्तानच्या या लीगमध्ये खेळणार्‍यांना भारतीय क्रिकेटशी कुठल्याही प्रकारे संबंध ठेवता येणार नाही, असा कडक इशारा दिला. यानंतर या खेळाडूंनी सदर लीगमधून माघार?घेतली आणि त्यावर आता पाकिस्तान आरडाओरडा करीत आहे. पण पाकिस्तानने हे सारे भारताची कुरापत काढण्यासाठीच केले होते, अशी टीका माजी क्रिकेटपटू व संसद सदस्य गौतम गंभीर यांनी केली.

बीसीसीआयच्या दणक्याने पाकिस्तानची ‘केपीएल’ कोलमडलीपाकिस्तानात आधीपासून ‘पाकिस्तान सुपर लीग-पीएसएल’ नावाची स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेकडे लक्ष केंद्रीत करण्याच्या ऐवजी पाकिस्तानने ‘काश्मीर प्रिमिअर लीग-केपीएल’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामागे केवळ भारताची कुरापत काढण्याचाच इरादा होता, अशी जळजळीत टीका गौतम गंभीर यांनी केली. पाकिस्तानच्या या प्रयत्नांना बीसीसीआयने चपराक लगावली हे उत्तमच झाले, असे सांगून गंभीर यांनी त्याचे स्वागत केले. माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद यांनीही खेळात राजकारण आणण्याचे पाकिस्तानच्या या कारवायांचा निषेध केला आहे. भारतच नाही तर पाकिस्तानातील काही पत्रकारांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सर्वाधिक महसूल भारताकडूनच जातो. त्यामुळे भारताचे क्रिकेटविश्‍वावर जबरदस्त नियंत्रण आहे. याचा लाभ घेऊन भारत नेहमीच पाकिस्तानला लक्ष्य करीत असल्याचा कांगावा या निमित्ताने पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी केला होता. केपीएलमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना सहभागी होण्यापासून रोखून भारताने आपली ताकद दाखवून दिली, असा ओरडा पाकिस्तानचे हे माजी खेळाडू करीत आहेत. पण मूळातच केपीएलचे आयोजन ही पाकिस्तानची राजकीय खेळी होती, याद्वारे पाकिस्तान काश्मीर प्रश्‍न आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित करू पाहत आहे, याकडे हे खेळाडू लक्ष द्यायला तयार नाहीत.

बीसीसीआयच्या दणक्याने पाकिस्तानची ‘केपीएल’ कोलमडलीपाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील अवघे पाच ते सहा खेळाडू पाकिस्तानातील क्रिकेट लीगमध्ये सहभागी होतात. असे असताना, पाकिस्तानव्याप्त काश्मीरसाठी वेगळी क्रिकेट स्पर्धा खेळविण्यामागे, आपण भारताविरोधात काहीतरी करीत आहोत, हे दाखवून देण्याचा पाकिस्तानच्या सरकारचा केविलवाणा प्रयत्न होता. ही बाब पाकिस्तानी पत्रकारांनीच उघड करून त्यावर नाराजी व्यक्त केली. यामुळे पाकिस्तानचे अधिक नुकसान झाल्याची खंत हे पत्रकार व्यक्त करीत आहेत.

गेल्या काही आठवड्यांपासून काश्मीरच्या प्रश्‍नावर आक्रमक भूमिका घेऊन आपण भारताला कोंडीत पकडल्याचे दाखवून देण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान व त्यांचे सरकार धडपडत आहे. विशेषतः पीओकेमध्ये पार पडलेल्या निवडणुकीनंतर आपल्यावर होणार्‍या गंभीर आरोपांपासून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी पाकिस्तानच्या सरकारने सारी शक्ती पणाला लावल्याचे दिसत आहे. मात्र काश्मीर प्रश्‍न आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित करण्यात, तसेच या प्रश्‍नावर भारताला अडचणीत टाकण्यात पाकिस्तानच्या सरकारला दारूण अपयश आले आहे. हे अपयश झाकण्यासाठी प्रचारमोहीम राबविण्याचे अनोखे तंत्र इम्रान खान यांचे सरकार राबवित आहे. केपीएलचे आयोजन हा याच प्रयत्नांचा भाग ठरतो. मात्र यालाही अपयश मिळाल्याने पाकिस्तानची निराशा अधिकच वाढल्याचे दिसत आहे.

leave a reply