मध्य चीनमध्ये आलेल्या महापुरातील बळींची संख्या तीनशेवर गेली

- 18 अब्ज डॉलर्सहून अधिक फटका बसल्याचा दावा

बीजिंग/हेनान – मध्य चीनमधील हेनान प्रांतात झालेली अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे झालेल्या जीवितहानीची व्याप्ती वाढली असून तब्बल 302 जणांचा बळी गेल्याचे सांगण्यात येते. हेनानची राजधानी झेंगझाऊमधील एका कार पार्किंगमध्ये जवळपास 39 जणांचे मृतदेह सापडल्याचे समोर आले आहे. पुरात अजूनही 50 जण बेपत्ता असून, एक कोटींहून अधिक नागरिकांना फटका बसल्याचे सांगण्यात येते. महापुरामुळे शेती व औद्योगिक क्षेत्रासह मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आर्थिक नुकसान 18 अब्ज डॉलर्सहून अधिक असल्याचे सांगण्यात येते.

मध्य चीनमध्ये आलेल्या महापुरातील बळींची संख्या तीनशेवर गेली - 18 अब्ज डॉलर्सहून अधिक फटका बसल्याचा दावागेल्या महिन्यात हेनान प्रांतात झालेल्या अतिवृष्टीचे परिणाम समोर येण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या काळात बळींची संख्या अवघी 50 ते 100च्या दरम्यान असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र सोमवारी हेनान प्रशासनाने बळींची एकूण संख्या 302 असल्याचे जाहीर केले. यातील 292 बळी एकट्या झेंगझाऊ शहरातील आहेत. पूर व पुरामुळे निर्माण झालेल्या गाळात 189 जणांचा बळी गेला आहे. अतिवृष्टीमुळे घरे कोसळून 54 जणांचा मृत्यू झाला असून भूमिगत पार्किंगमध्ये 39 जणांचे मृतदेह सापडल्याचे सांगण्यात आले. किमान 50 जण अद्यापही बेपत्ता असून बळींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

हेनान प्रांतातील एक कोटी, 30 लाखजणांना अतिवृष्टी व पुराचा फटका बसला आहे. झेंगझाऊ शहर व नजिकच्या परिसरातील जवळपास नऊ हजार घरांची हानी झाली आहे. हेनान प्रांतातील जवळपास सहा लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून कारखाने, ऐतिहासिक वास्तू व पर्यटनस्थळांनाही मोठा फटका बसला आहे. आर्थिक नुकसान 18 अब्ज डॉलर्सच्या वर गेले असून स्थानिक नागरिकांनी जवळपास 1.7 अब्ज डॉलर्सचे विम्याचे दावे ठोकल्याची माहिती कंपन्यांनी दिली आहे.

हेनान प्रांत व झेंगझाऊमधील नुकसानीची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासन व अधिकारी जबाबदार असल्यास त्यांच्यावर कारवाई होईल, असे कम्युनिस्ट राजवटीकडून सांगण्यात आले. स्थानिक जनतेत तसेच सोशल मीडियावर झेंगझाऊमधील महापुरावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही स्थानिक नागरिकांनी मेट्रो यंत्रणा तसेच प्रशासनाविरोधात कायदेशीर कारवाईचे इशारेही दिले आहेत. सोशल मीडियावर उमटलेल्या प्रतिक्रियांमध्ये प्रशासनाला लक्ष्य करण्यात आले असून मोठे व दिखाऊ प्रकल्प उभारण्यापेक्षा पायाभूत सुविधा नीट उभ्या करण्यावर अधिक लक्ष द्यायला हवे, असा टोला लगावण्यात आला आहे.

हेनानमधील अतिवृष्टी व महापूर आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चेचा विषय ठरला आहे. झेंगझाऊमध्ये महापुराचे वार्तांकन करणार्‍या आंतरराष्ट्रीय पत्रकारांना धक्काबुक्की झाल्याचे, अपशब्द उच्चारण्यात आल्याचे तसेच त्यांची टेहळणी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या मुद्यावरून अमेरिका व युरोपातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सत्ताधारी राजवटीने स्वतःची पाठ थोपटून घेतली होती. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या भाषणात देशाच्या प्रगतीचे व विकासाचे वर्णन करताना प्रगत अर्थव्यवस्थांनाही मागे टाकल्याचे दावे केले होते. मात्र हेनान प्रांतात झालेली अतिवृष्टी, त्यातील जीवित व वित्तहानी, चिनी यंत्रणांनी केलेली हाताळणी व नुकसानीचे दावे यातून कम्युनिस्ट राजवटीचे दावे पोकळ ठरल्याचे दिसून येत आहे.

leave a reply