अफगाणिस्तानातील घडामोडींचा भारताच्या सुरक्षेवर थेट परिणाम संभवतो

- संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे राजदूत तिरूमुर्ती

संयुक्त राष्ट्रसंघ – ‘दहशतवाद्यांना पुन्हा एकदा अफगाणिस्तानात परतण्याची संधी देता येणार नाही. अफगाणिस्तानातील या घडामोडींचा भारताच्या सुरक्षेशी थेट परिणाम संभवतो’, असे संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे राजदूत टी. एस. तिरूमुर्ती यांनी बजावले. त्याचबरोबर सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद आलेला भारत दहशतवादावरील ‘स्पॉट लाईट’ कायम ठेवेल, असे तिरूमुर्ती पुढे म्हणाले. भारताकडे सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद आल्यानंतर पाकिस्तानच्या चिंता वाढल्या असून या अध्यक्षपदाच्या काळात भारत पाकिस्तानसमोर नवी आव्हाने उभी करील, अशी चिंता पाकिस्तानचे नेते व राजनैतिक अधिकार्‍यांनी व्यक्त केली होती.

सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद आल्यानंतर भारत दहशतवादविरोधी कारवाया व सागरी सुरक्षेला प्राधान्य देईल - संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे राजदूत तिरूमुर्तीया महिन्यात भारताकडे आलेल्या सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदाला विशेष महत्त्व देण्यात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरक्षा परिषदेद्वारे आयोजित करण्यात आलेल्या मुक्त चर्चेचे अध्यक्षपद स्वीकारणार आहेत. ‘सागरी सुरक्षा’ हा या 9 ऑगस्ट रोजी होणार्‍या चर्चेचा विषय असेल. तर 18 ऑगस्ट रोजी होणार्‍या तंत्रज्ञान व शांतीमोहीम या विषयावरील चर्चेचे अध्यक्ष भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर असतील. 19 ऑगस्ट रोजी ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेवर चर्चा होणार आहे. त्यामुळे भारताने जाहीर केल्यानुसार सुरक्षा परिषद दहशतवाद व सागरी सुरक्षेला सर्वाधिक महत्त्व देणार आहे. राजदूत तिरूमुर्ती यांनीही पत्रकारांशी बोलताना यासंदर्भातील भारताच्या भूमिकेची माहिती दिली. अफगाणिस्तानातील दहशतवाद व भारताच्या सुरक्षेशी त्याचा संबंध यावरही तिरूमुर्ती यांनी प्रकाशझोत टाकला.

‘अफगाणिस्तानातील घडामोडी हा सुरक्षा परिषदेच्या सर्वच सदस्यदेशांच्या चिंतेचा विषय बनला आहे. अफगाणिस्तानातील रक्तपात वाढतच चालला आहे. सुरक्षा परिषदेला लवकरच यावर विचार करावा लागेल. भारतापुरते बोलायचे झाले तर भारताला स्वतंत्र, शांत, लोकशाहीवादी आणि स्थीर अफिगाणिस्तान हवा आहे. यासाठी भारताने शक्य तितके सहाय्य पुरविलेले आहे’, असे तिरूमुर्ती म्हणाले. ‘अफगाणिस्तानातील हिंसाचार थांबवायलाच हवा. अफगाणिस्तानात परतण्याची संधी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांना देता येणार नाही. अफगाणिस्तानातील दहशतवादाचा भारताच्या सुरक्षेवर थेट परिणाम संभवतो’, असे तिरूमुर्ती पुढे म्हणाले.

यासाठी भारत दहशतवादावरील ‘स्पॉट लाईट’ कायम ठेवेल, असे राजदूत तिरूमुर्ती यांनी स्पष्ट केले. सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदाचा भारत पाकिस्तानच्या विरोधात वापर करील, अशी चिंता पाकिस्तानचे नेते व माजी लष्करी अधिकारी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे पाकिस्तानसमोरील अडचणींमध्ये वाढ झाल्याचा दावाही या सर्वांनी केला. पाकिस्तानची माध्यमे देखील भारताच्या नावाने खडे फोडत असून आपल्या देशाची भारताने दहशतवादी अशीच प्रतिमा निर्माण केल्याचे पाकिस्तानी माध्यमांचे म्हणणे आहे.

leave a reply