भारतीय वायुसेनेची प्रतिहल्ला चढविण्याची क्षमता वाढली

- वायुसेनाप्रमुख आर.के.एस. भदौरिया

प्रतिहल्लानवी दिल्ली – पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोटमध्ये चढविण्यात आलेला हवाई हल्ला, तसेच गलवानमध्ये झालेल्या संघर्षानंतर भारतीय वायुसेना आपली क्षमता वाढविण्याकडे अधिक लक्ष पुरविले आहे. यामुळे बालाकोट आणि गलवान संघर्षानंतर भारताच्या प्रतिहल्ल्याच्या क्षमतेत मोठी वाढ झाली असून याबाबतीत भारताला मोठे सामर्थ्य प्राप्त झाले आहे, असे वायुसेना प्रमुख एअर मार्शल आर.के.एस. भदौरिया म्हणाले. तसेच वायुसेनेमध्ये राफेलच्या समावेशानंतर भारतीय वायुसेनेचे सामर्थ्य अधिकच वाढले असून पुढील टप्प्यातील कायापालटास सुरूवात झाल्याचेही वायुसेनाप्रमुखांनी अधोरेखित केले.

पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये करण्यात आलेला सर्जिकल स्ट्राईक व गलवानमधील संघर्षानंतर बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत. देशाच्या उत्तर आणि पश्‍चिम अशा दोन्ही सीमा रेषेवर जलदगतीने प्रतिहल्ला चढविण्याची वायुसेनेची क्षमता वाढली आहे. याबाबती भारताने आघाडी घेतल्यावे वायुसेना प्रमुख भदौरिया यांनी म्हटले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून, लक्ष भेदण्याच्या आपल्या क्षमतेत वाढ करून, तसेच देशाच्या संपत्तीच्या संरक्षणाची क्षमता अधिक मजबूत करण्यावर वायुसेना अधिकाधिक भर देत आहे, याकडे लष्करप्रमुखांनी लक्ष वेधले.

वायुसेनेचा वापर करणे म्हणजे आक्रमकता दाखविणे, असा समज आहे. विशेष करून भारतीय उपखंडामध्ये वायुसेनेच्या वापराकडे आक्रमकता म्हणूनच पाहिले जाते. त्यामुळे वायुशक्तीचा वापर टाळण्यावर भर दिला जातो. पण परिस्थिती खूपच बदललेली आहे, हे लक्षात घेऊन आपल्याला आता पुढे जायला हवे, असे वायुसेनाप्रमुख म्हणाले. युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (युएसआय) या अभ्यासगटाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना वायुसेनाप्रमुखांनी इस्रायलचेही उदाहरण दिले. इस्रायल आणि हमासमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या ११ दिवसांच्या संघर्षात गाझामध्ये कट्टरतावादी गटाच्या ठिकाणांना अचूकपणे टिपण्यासाठी इस्रायलने सर्जिकल मोहिम हाती घेतली होती. कमीतकमी नुकसान व्हावे यासाठी इस्रायलने हे केले होते. इस्रायलच्या वायुसेनेच्या लक्ष्य भेदण्याच्या क्षमतेमुळे हे शक्य झाले ही बाब त्यांनी यावेळी अधोरेखित केली. वायुसेनाप्रमुख नुकतेच इस्रायल दौर्‍यावरून परतले आहेत.

leave a reply