…तर रशिया व चीन अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवतील

- युरोपिय महासंघाच्या परराष्ट्र प्रमुखांचा इशारा

ब्रुसेल्स/काबुल – युरोपिय महासंघाने अफगाणिस्तानात हस्तक्षेप केला नाही तर रशिया व चीन त्यावर ताबा मिळवतील, असा इशारा युरोपिय महासंघाचे परराष्ट्र प्रमुख जोसेप बॉरेल यांनी दिला. अफगाणिस्तानमधील परिस्थिती ही भयावह आपत्ती असून, हे वास्तव स्वीकारावे लागेल, असेही बॉरेल यांनी बजावले. अफगाणिस्तानच्या मुद्यावर युरोपिय महासंघाच्या सदस्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठकही पार पडली आहे. मात्र या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नसून, या पार्श्‍वभूमीवर बॉरेल यांनी केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते.

...तर रशिया व चीन अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवतील - युरोपिय महासंघाच्या परराष्ट्र प्रमुखांचा इशारा‘तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळविल्याचे व त्यानंतरचे वास्तव छायाचित्रे तसेच इतर माध्यमांमधून समोर येत असून त्याला तोंड देणे भाग आहे. अफगाणिस्तानबाबत नक्की काय चूक झाली हा प्रश्‍न आंतरराष्ट्रीय समुदायाने स्वतःलाच विचारायला हवा. पण त्याचवेळी अफगाणिस्तानमधील स्थितीचा फायदा चीन व रशियाला घेऊन देणे चुकीचे ठरेल. तालिबानला समर्थन देऊन त्यांनी अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळविले तर पुढील काळात युरोपिय महासंघाला कोणीही विचारणार नाही’, असा इशारा बॉरेल यांनी दिला. रशिया व चीनला रोखायचे असेल तर युरोपिय महासंघाने अफगाणिस्तानातील स्थितीत तातडीने हस्तक्षेप करायला हवा, असा सल्लाही बॉरेल यांनी दिला.

अफगाणिस्तानात जे काही घडले त्यामुळे अनेक सवाल उपस्थित होत असल्याकडे महासंघाच्या परराष्ट्र प्रमुखांनी लक्ष वेधले. ‘पाश्‍चात्य देशांनी 20 वर्षे अफगाणिस्तानात राहून नक्की काय साध्य केले हा मोठा प्रश्‍न आहे. या काळात आपण कोणत्या गोष्टींमध्ये यश मिळविलं, याचा विचार करावा लागेल’, असेही बॉरेल पुढे म्हणाले. युरोपियन संसदेच्या सदस्यांना उद्देशून केलेल्या वक्तव्यात परराष्ट्र प्रमुखांनी, अफगाणिस्तानमधील सध्याची स्थिती भयावह आपत्ती असल्याची कबुलीही दिली.
अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या माघारीवर नाटोचे सदस्य देश असणाऱ्या युरोपिय देशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अनेक युरोपिय नेत्यांनी अमेरिकेने लष्करी तैनाती कायम ठेवावी, असे आवाहनही केले होते.

leave a reply