ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येईल – तज्ज्ञांची चिंता

नवी दिल्ली – दुसरी लाट पूर्णत: ओसरण्याआधीच कोरोनाच्या तिसर्‍या लाटेबाबत अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. यासंदर्भात निरनिराळे अहवाल प्रसिद्ध झाले असून सर्व अहवालांमध्ये कोरोनाच्या साथीची तिसरी लाट लवकरच येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याच्या टास्क फोर्सने येत्या चार आठवड्यात तिसरी लाट येऊ शकते, तसेच ही लाट दुसर्‍या लाटेपेक्षा भयंकर असेल, अशी भिती व्यक्त केल्याच्या बातम्या होत्या. मात्र यासंदर्भात तज्ज्ञांच्या हवाल्याने प्रसिद्ध झालेल्या एका वृत्त अहवालात कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच ही लाट सध्याच्या लाटेपेक्षा नियंत्रणात असेल, असा दावा करण्यात आला आहे.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेबाबत अंदाज व्यक्त करणारे निरनिराळे तीन अहवाल व तज्ज्ञांचे इशारे समोर आले आहेत. या तिनही अहवालात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेबाबत सावध करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारच्या कोविड टास्क फोर्सने निर्बंध शिथिल केल्यावर उसळलेली गर्दी पाहता दुसरी लाट पुर्ण ओसरण्याआधीच तिसरी लाट सुरू होईल, असे म्हटल्याचे वृत्त गुरुवारी प्रसिद्ध झाले होते. ही तिसरी लाट येत्या तीन ते चार आठवड्यातही येऊ शकते. तसेच ही तिसरी लाट ही दुसर्‍या लाटेपेक्षा भयंकर ठरेल. ऍक्टिव्ह रुग्णांची जास्ती जास्त संख्या दुसर्‍या लाटेपेक्षा तिसर्‍या लाटेत एक लाखांहून अधिक असेल, असे इशारे दिल्याच्या बातम्या होत्या. तसेच यामध्ये लहानमुले, तसेच गरीब व मध्यमवर्गींयांमध्ये संसर्ग वाढेल, अशी भीतीही व्यक्त केली होती.

मात्र वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि द ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सने पाच राज्यात केलेल्या सिरो सर्वेक्षणाच्या आधारे या लाटेवर मुलांना जास्त धोका असल्याचे अमान्य केले आहे. तर तज्ज्ञांशी चर्चा करून प्रसिद्ध करण्यात आलेल्या तिसर्‍या एक अहवालातही नव्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र ही लाट सध्याच्या लाटेपेक्षा नियंत्रणात असेल, असा दावा करण्यात आला आहे. मत विचारण्यात आलेल्या ३४ पैकी २४ तज्ज्ञांनी तिसरी लाट ही दुसर्‍या लाटेपेक्षा बर्‍याच प्रमाणात नियंत्रणात राहिल, असे म्हटले आहे. कारण दुसर्‍या बाजूला लसीकरणाने वेग पकडलेला असेल. तसेच लसीकरण झालेल्यांची संख्याही वाढलेली असेल, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. यामुळे दुसर्‍या लाटेपेक्षा तिसर्‍या लाटेत संक्रमितांचे प्रमाण खूपच कमी राहिल, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. या सर्वेक्षणात बहुतांश तज्ज्ञांनी तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये येईल, अशी शक्यता वर्तविली आहे. तसेच बर्‍याच तज्ज्ञांनी मुलांना धोका कमी असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, लसीकरणामुळे कोरोनाची लागण झाल्यावर रुग्णालयात दाखल व्हावे लागेल अशी स्थिती ७५ ते ८० टक्क्यांने कमी होते, असे अभ्यासात लक्षात आल्याचे सरकारने म्हटले आहेत. तसेच ऑक्सिजनची गरज भासेल अशा स्थितीतही कमी रुग्ण पोहोचतील, असा दावा करण्यात आला आहे. ७ मे रोजी देशात आतापर्यंत एका दिवसातील सर्वाधिक नवे रुग्ण आढळले होते. ही संख्या ४ लाख १० हजारांच्या पुढे होती. या उच्चांकापासून आतापर्यंत ८५ टक्क्यांने दैनदिन रुग्णांचे प्रमाण घटले आहे. तसेच ऍक्टीव्ह केसेस ७८ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. ५१३ जिल्ह्यांचा पॉझिटिव्ह दर हा ५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. शुक्रवारच्या सकाळपर्यंतच्या चोवीस तासात देशात कोरोनाचे ६२ हजार ४८० नवे रुग्ण आढळले होते. तसेच १ हजार ५८७ जणांचा बळी गेला होता.

leave a reply