चीनला धमकावणार्‍या व चिरडण्याचा प्रयत्न करणार्‍यांना चीनच्या पोलादी भिंतीची धडक बसेल – राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा इशारा

बीजिंग – ‘कोणत्याही परदेशी शक्तीकडून चीनला दमदाटी करण्याचा, दडपण्याचा किंवा नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. जे कोणी असा प्रयत्न करतील त्यांना 1.4 अब्ज चिनी जनतेने तयार केलेल्या अभेद्य पोलादी भिंतीची धडक बसेल, हे लक्षात ठेवा’, असा इशारा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिला.

1 जुलै रोजी कम्युनिस्ट पार्टीच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात कम्युनिस्ट पार्टीचे सर्वेसर्वा व चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी कम्युनिस्ट पार्टीच कार्यकर्त्यांसह चिनी जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी गेल्या शतकाच्या सुरुवातीला असलेली चीनची अवस्था व त्यानंतर झालेला कम्युनिस्ट पार्टीचा उदय आणि वाटचालीचे जोरदार समर्थन केले. चीनच्या विकासासाठी कम्युनिस्ट पार्टी व चीनची वैशिष्ट्ये असलेला समाजवाद आवश्यक असल्याचा दावाही जिनपिंग यांनी केला.

चीनची सर्वांगीण प्रगती व जगात मिळविलेले स्थान याबद्दल कम्युनिस्ट राजवटीची पाठ थोपटतानाच, चीन कोणाकडूनही अनावश्यक उपदेशाचे डोस ऐकून घेणार नाही, असे बजावले. जिनपिंग यांचा हा टोला मानवाधिकारांच्या मुद्यावरून चीनला सुनावणार्‍या अमेरिका व युरोपिय देशांना होता, असे सांगण्यात येते. यावेळी जिनपिंग यांनी हाँगकाँग, मकाव तसेच तैवानच्या मुद्यावरही आक्रमक भूमिका घेतली. हाँगकाँग व मकावमध्ये ‘एक देश, दोन व्यवस्था’ या तत्वावरच वाटचाल सुरू असून दोन्ही भागात स्थानिक जनतेच्या हाती नियंत्रण असल्याचा दावा त्यांनी केला.

‘तैवानच्या स्वातंत्र्यासाठी सुरू असलेले कोणत्याही प्रकारचे प्रयत्न ठाम निर्धारासह कारवाई करून हाणून पाडले जातील. तैवानच्या विलिनीकरणासाठी चांगले भविष्य घडविण्यात येईल. सार्वभौमत्त्व व एकजूट कायम राखण्यासाठी चिनी जनतेकडे असलेली क्षमता व इच्छा याकडे दुर्लक्ष करण्याची चूक कोणीही करु नये’, असा इशारा देऊन तैवानचा मुद्दा चीनची कम्युनिस्ट राजवट कधीही सोडणार नाही, असे जिनपिंग यांनी बजावले. चीनच्या राष्ट्राध्यक्षांकडून देण्यात आलेल्या या धमकीवर तैवानकडून प्रतिक्रिया उमटली. चीनने आपली राजकीय चौकट लादण्याचा व लष्करी बळाचा वापर करण्याचा प्रयत्न करू नये, असे तैवानने बजावले आहे.

चीनच्या कम्युनिस्ट राजवटीला सध्या अंतर्गत तसेच बाह्य पातळीवर असंतोषाचा सामना करावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. कोरोनाची साथ, हाँगकाँगमधील कायदा, उघुरवंशियांवर होणारे अत्याचार, तैवानला देण्यात येणार्‍या धमक्या व साऊथ चायना सीमधील विस्तारवादी कारवाया यामुळे चीनच्या राजवटीबद्दल जगभरात नाराजीचे वातावरण आहे. अमेरिका व युरोपिय देश चीनच्या मुद्यावर एकत्र येत असून पुढील काळात चीनला त्यांचे मोठे आव्हान मिळेल, असे संकेत मिळत आहेत. आर्थिक आघाडीवरही चीनची कामगिरी फारशी चांगली नसून, आघाडीच्या भागीदार देशांबरोबरच चीनचा व्यापारी संघर्ष सुरू आहे.

अंतर्गत पातळीवरही जिनपिंग यांच्या वाढत्या एकाधिकारशाही विरोधात नाराजी समोर येऊ लागली आहे. कम्युनिस्ट पक्ष व राजवटीचे सर्वाधिकार जिनपिं यांच्या हाती एकवटले असताना, त्यांना मिळालेले अपयश कम्युनिस्ट राजवटीला भलतेच महाग पडेल, अशी चर्चा चीनमध्ये सुरू झाली आहे. पुढच्या काळात जिनपिंग यांना चीनच्या कम्युनिस्ट पक्षातूनच आव्हान मिळले, अशी शक्यता काहीजण वर्तवित आहेत. कोरोनाची साथ चीनने पसरविल्याचे पुरावे जगासमोर आले, तर त्याचा धक्का राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना बसेल आणि त्यामुळे चीनमध्ये नेतृत्त्वबदल होऊ शकेल, अशी शक्यता विख्यात विश्‍लेषक गॉर्डन चँग यांनी व्यक्त केली होती.

leave a reply