‘ऑपरेशन समुद्र सेतू’ आणि ‘वंदे भारत’अंतर्गत हजारो भारतीय मायदेशी दाखल

नवी दिल्ली – कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या ‘ऑपरेशन समुद्र सेतू’ आणि ‘वंदे भारत’ या मोहीमेद्वारे तीन दिवासात सुमारे ३५०० भारतीयांना मायदेशी आणण्यात आले आहे. तसेच रविवारी दुपारी आणखी २४३ भारतीयाना घेऊन एअर इंडियाचे विमान सिंगापूरहून मुंबईला दाखल झाले. ब्रिटनवरून शनिवारी रात्री ३२६ भारतीय मुंबईत दाखल झाले होते, तर नौदलाची ‘आयएनएस जलाश्व’ ही युद्धनौका ६९८ भारतीयांना घेऊन मायदेशी परतली आहे.

कोरोनाव्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी ७ ते १३ मे या कालावधीत मोहीम हाती घेण्यात आली आहे. वंदे भारत’ या मोहीमेद्वारे पहिल्या टप्यात १२ देशातून १५ हजार भारतीयांना मायदेशी आणण्यात येत आहे. आतापर्यंत ब्रिटन, कुवेत, मस्कत, शारजा, क्वालालांपूर, व ढाकामधून आठ विमानांच्या मदतीने भारतीयांना मायदेशी आणण्यात आले आहे. शनिवारी १२९ भारतीयांसह ढाका येथून पहिले विमान दिल्लीत दाखल झाले होते, तर शनिवारी रात्री उशिरा ब्रिटनमधून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर ३२६ भारतीय मायदेशी पतरले. त्याआधी ओमान आणि कुवेतमध्ये अडकलेल्या ३६२ भारतीयांना घेऊन दोन विमान भारतात दाखल झाली होती. यासह १७७ भारतीयांना मलेशियावरून परतले आणण्यात आले आहे.

संयुक्त अरब अमिरातीवरून (युएई) ३५० भारतीयांना मायदेशी आणण्यात आले. १८० हून अधिक भारतीय शारजाहून परतले आहेत. याचबरोबर रविवारी दुपारी २४३ भारतीयाना घेऊन एअर इंडियाचे विमान सिंगापूरहून मुंबई विमानतळावर उतरले. फिलिपाइन्समधून २४१ भारतीयांना परत आणण्यात येत आहे. सोमवारी अमेरिकेतून २०० भारतीय मुंबईत दाखल होतील. अमेरिकेतील २५०० भारतीय नागरिकांनी भारतात येण्यासाठी नोंदणी केली आहे.

याशिवाय ‘ऑपरेशन समुद्र सेतू’ मोहिमेच्या माध्यमातून भारतीय नौदलाचे ‘आयएएनएस जलाश्व’ मालदीवहून ६९८ भारतीयांना घेऊन कोचीला पोहोचले आहेत. ‘आयएएनएस जलाश्व’ ८ मे रोजी मालदीवहून निघाली होती आणि रविवारी सकाळी ८ वाजता कोचीला पोहोचल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

कोरोनाव्हायरसचा फैलाव होत असल्याने जगभरात अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांकडून मायदेशात परतण्यासाठी मदतीची मागणी करण्यात येत होती. त्यानंतर केंद्र सरकारने भारतीयांना माघारी आणण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमेअंतर्गत सुमारे अडीच लाख नागरिकांना मायदेशी आणण्यात येणार आहे.

leave a reply