पाकिस्तानातून हजारो दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानात घुसखोरी केली

- अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना खडसावले

ताश्कंद – अफगाणिस्तानातील परिस्थितीसाठी पाकिस्तानला जबाबदार धरू नका, पाकिस्तानचा आणि तालिबानचा काहीच संबंध नाही, असे दावे पाकिस्तानकडून केले जातात. पण उझबेकिस्तानच्या ताश्कंद येथील परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासमोरच, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी पाकिस्तानच्या दहशतवादाचे वाभाड काढले. गेल्या महिन्यात दहा हजाराहून अधिक संख्येने पाकिस्तानातील दहशतवादी अफगाणिस्तानात घुसले आणि त्यांना रोखण्यात पाकिस्तानचे सरकार अपयशी ठरले, असा घणाघाती आरोप राष्ट्राध्यक्ष गनी यांनी केला. यामुळे अस्वस्थ झालेल्या इम्रान खान यांची या आरोपांना उत्तर देताना तारांबळ उडाल्याचे दिसत होते.

पाकिस्तानातून हजारो दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानात घुसखोरी केली - अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना खडसावलेउझबेकिस्तानच्या ताश्कंदमध्ये ‘सेंट्रल अँड साऊथ एशिया कनेक्टिव्हीटी कॉन्फरन्स’ आयोजित करण्यात आली आहे. यावेळी बोलताना अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानवर हे गंभीर आरोप केले. अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आणण्यात पाकिस्तानला स्वारस्य नाही, असे आश्‍वासन या देशाचे पंतप्रधान व लष्करी अधिकारी सातत्याने देत आहेत. पण दुसर्‍या बाजूला ते तालिबानला सर्वतोपरी सहाय्य पुरवित आहेत, असा ठपका अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी ठेवला. यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचे आरोप निराश करणारे असल्याचे सांगून त्यावर नाराजी व्यक्त केली. तालिबानने चर्चा करावी व अफगाणिस्तानचा प्रश्‍न शांततेने सुटावा यासाठी पाकिस्ताननेच सर्वाधिक प्रयत्न केले होते, असे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले.

अफगाणिस्तानकडून पाकिस्तानवर हे थेट आरोप होत असताना, भारताने मात्र अफगाणिस्तानला सर्वतोपरी सहाय्याचे आश्‍वासन दिले आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर देखील ताश्कंदमधील या परिषदेत सहभागी झाले असून त्यांनी अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली. या भेटीत परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी अफगाणिस्तानला सर्वतोपरी सहकार्याचे आश्‍वासन दिले. भारत अफगाणिस्तानला सुमारे दीड लाख टन इतक्या प्रमाणात गहू पुरविणार असल्याची माहिती जयशंकर यांनी यावेळी दिली.

दरम्यान, अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांनी तसेच अफगाणिस्तानचे भारतातील राजदूत फरिद मामुन्दजई यांनी भारताकडे लष्करी सहाय्याची मागणी केली होती. तालिबानबरोबरील चर्चा फसली तर भारताने अफगाणिस्तानला ‘एअर सर्पोट’ अर्थात हवाई दलासाठी सहाय्य करावे, असे राजदूत मामुन्दजई म्हणाले होते. या आवाहनानंतर पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. भारत लवकरच अफगाणिस्तानात आपले सैन्य तैनात करणार असल्याचे दावे पाकिस्तानी माध्यमे करू लागली आहेत. भारताच्या या तैनातीला अमेरिकेचा पूर्ण पाठिंबा असेल व त्यासाठी अमेरिका भारताला पैसे पुरवायला तयार असल्याचे दावे पाकिस्तानातील भारतद्वेष्ट्या विश्‍लेषकांनी ठोकून दिले आहेत. यामुळे पाकिस्तान अधिकच असुरक्षित बनेल, अशी चिंता देखील या भारतद्वेष्ट्या पाकिस्तानी विश्‍लेषकांना वाटू लागली आहे.

कंदहारमध्ये भारतीय पत्रकाराची हत्या

अफगाणिस्तानच्या कंदहारमध्ये भारतीय पत्रकार दानिश सिद्दिकी याची तालिबानने हत्या घडविली. पुलित्झर पुरस्कार विजेते फोटो जर्नलिस्ट सिद्दिकी अफगाणी लष्करासोबत तालिबानविरोधी संघर्षाची माहिती मिळविण्यासाठी फिरत होते. या संघर्षात तालिबानी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सिद्दिकी अफगाणी जवानासह ठार झाले. माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी सिद्दिकी यांच्या हत्येवर तीव्र दुःख व्यक्त केले. प्रेस क्लबने सिद्दिकी यांची हत्या धक्कादायक असल्याचे सांगून त्यावर शोक व्यक्त केला आहे.

कंदहारमध्ये भारतीय पत्रकाराची हत्याअफगाणिस्तानचा बराचसा भूभाग बळकावल्यानंतरही तालिबानने आत्तापर्यंत भारतीयांवर हल्ला चढविला नव्हता. पण सिद्दिकी अफगाणिस्तानातील संघर्षात बळी गेलेले पहिले भारतीय ठरले आहेत. यामुळे या देशातील भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्‍न संवेदनशील बनल्याचे दिसत आहे. दरम्यान, अफगाणिस्तानातील संघर्षात भारताने काबुलमधील सरकारला सहाय्य करू नये, अशी मागणी तालिबानने केली आहे. अफगाणिस्तानात भारत करीत असलेल्या विकासाचे तालिबान स्वागत करील, पण इथल्या संघर्षात भारताने तटस्थ राहिलेले बरे, असे तालिबानने बजावले आहे.

भारतीय दूतावासांवर हल्ले चढविले जाणार नाहीत, असे तालिबानने याआधीच स्पष्ट केले होते, याची आठवण तालिबानचा प्रवक्ता सुहेल शाहीन याने करून दिली आहे.

leave a reply