भारतासह दक्षिण आशियाच्या स्थैर्याला महत्त्वाकांक्षी चीनपासून धोका

- संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत

नवी दिल्ली – बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि मालदीव या देशांमध्ये गुंतवणूक वाढवून चीन इथे धोरणात्मकदृष्ट्या आपले पाय रोवत आहे. महत्त्वाकांक्षी चीनच्या या कारवाया भारतासाठी घातक ठरतात. भारतच नाही तर दक्षिण आशियाच्या स्थैर्याला चीनच्या या कारवायांचा फार मोठा धोका संभवतो, असे संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी बजावले. एका दिवसापूर्वी सायबर व अवकाश क्षेत्रातील चीनची प्रगती भारतासाठी धोकादायक ठरेल, असे संरक्षणदलप्रमुखांनी बजावले होते.

भारतासह दक्षिण आशियाच्या स्थैर्याला महत्त्वाकांक्षी चीनपासून धोका - संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावतबांगलादेश व म्यानमार या देशांना मोठ्या प्रमाणात चीनकडून लष्करी सहाय्य पुरविण्यात आले होते. याबरोबरच नेपाळ, श्रीलंका आणि मालदीव या देशांमध्ये चीनने लक्षणीय गुंतवणूक करून या क्षेत्रात धोरणात्मकदृष्ट्या आपले पाय रोवले आहेत. म्यानमार आणि बांगलादेशमधील चीनच्या गुंतवणुकीकडे अजिबात दुर्लक्ष करता येणार नाही. कारण चीनची ही गुंतवणूक भारताला घेरण्यासाठीच चीन करीत आहे. यापासून क्षेत्राच स्थैर्याला सर्वव्यापी धोका संभवतो. भारताची अखंडता व भारताचे धोरणात्मक महत्त्व यांच्यासाठी चीनच्या या कारवाया घातक ठरतील, असे जनरल रावत यांनी म्हटले आहे.

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद हा या क्षेत्रातील शांततेसाठी धोकादायक असून पाकिस्तानल चीनकडून मिळणारे लष्करी सहाय्य भारताच्या विरोधातील चीनच्या डावपेचांचा भाग असल्याचा आरोप जनरल रावत यांनी केला. या सार्‍या गोष्टींचा दाखला देऊन चीनबरोबरच्या सीमावादाकडे भारताने समग्र दृष्टीने पाहण्याची गरज असल्याचे लक्षात आणून दिले. भारत व चीनमधल्या सीमावादाचा तेवढ्यापुरता विचार करून चालणार नाही, तर त्याचा चीनच्या महत्त्वाकांक्षेशी संबंध आहे, हे लक्षात घ्यावेच लागेल, याकडे जनरल रावत लक्ष वेधत आहेत.

म्हणूनच भारत व चीनमधील सीमावाद सोडविण्यासाठी घाई करून चालणार नाही. देशाची संरक्षण व्यवस्था व संरक्षणदलांची क्षमता यावर जनतेने विश्‍वास ठेवावा आणि याबाबत आत्मविश्‍वास बाळगावा, असा लक्षवेधी संदेश संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी दिला. चीनला आपल्या आर्थिक ताकदीचा वापर करून संबंधित देशांमध्ये आपली लोकप्रियता वाढविण्याची सवय जडलेली आहे, ही बाब देखील जनरल रावत यांनी लक्षात आणून दिली. मात्र सर्वांचाच विकास व सर्वांचा विश्‍वास, या धोरणावर भारत काम करीत आहे. शेजारी देशांनाही भारताने हाच संदेश देऊन आम्ही कायम तुमच्या मागे उभे आहोत, अशी ग्वाही देण्याची गरज आहे, असे जनरल रावत पुढे म्हणाले. आपल्या शेजारी देशांबरोबरील संबंध दृढ करण्यासाठी भारताला या देशांबरोबरील आपल्या सांस्कृतिक संबंधांना भारताला उजाळा द्यावा लागेल, असा सल्ला जनरल रावत यांनी दिला आहे.

leave a reply