अमेरिकेने पाकिस्तानबरोबरची मैत्री तोडण्याची वेळ आली आहे

- अमेरिकी विश्‍लेषकाचा इशारा

वॉशिंग्टन – ‘पाकिस्तानला कट्टर शत्रूंच्या जवळ ढकलण्याची अमेरिकेची इच्छा नाही. पण जर पाकिस्तानच्या नेत्यांनाच चीन, इराणबरोबरच तालिबान, अल कायदा आणि इतर दहशतवादी संघटनांशी संसार थाटायचा असेल तर त्यांनी खुशाल जावे. हे लग्न फार काळ टिकणार नाही. अमेरिकेने पाकिस्तानबरोबरची मैत्री तोडण्याची हीच वेळ आहे’, असा इशारा अमेरिकन विश्‍लेषक क्लिफर्ड मे यांनी दिला. पाकिस्तानबरोबरच्या संबंधांवर फेरविचार करण्याची आवश्यकता असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते. या पार्श्‍वभूमीवर, क्लिफर्ड यांनी दिलेला इशारा पाकिस्तानचा थरकाप उडविणारा ठरतो.

अमेरिकेने पाकिस्तानबरोबरची मैत्री तोडण्याची वेळ आली आहे - अमेरिकी विश्‍लेषकाचा इशारा‘अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या मानहानिकारक माघारीसाठी कुणाला जबाबदार धरायचे? अफगाणिस्तानात अडकलेल्या अमेरिकी व अफगाणी नागरिकांच्या धोक्यात आलेल्या जीवासाठी कोण जबाबदार आहे? राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यावर या सगळ्याची जबाबदारी येऊन थांबते. पण या ऐतिहासिक फजितीसाठी जबाबदार असलेल्या पाकिस्तानच्या प्रमुख नेत्यांकडे अजिबात दुर्लक्ष करता येणार नाही’, अशा जळजळीत शब्दात क्लिफर्ड यांनी पाकिस्तानला लक्ष्य केले.

अमेरिकेने पाकिस्तानबरोबरची मैत्री तोडण्याची वेळ आली आहे - अमेरिकी विश्‍लेषकाचा इशारा१९९०च्या दशकात पाकिस्तानच्या लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेतील प्रभावी गटांनी तालिबानची निर्मिती केली व त्यांना प्रशिक्षण, फंडींग सुरू ठेवले. अमेरिकेने २००१ साली अफगाणिस्तानात दहशतवादविरोधी युद्ध पुकारल्यानंतरही पाकिस्तानने अल कायदा, तालिबान व इतर दहशतवादी संघटनांना सहाय्य करणे सुरूच ठेवले होते, याकडे अमेरिकी विश्‍लेषकांनी लक्ष वेधले. अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याला पाकिस्तानात आश्रय दिल्याचा आपण फार आधी केलेला आरोपही खरा ठरल्याची आठवण क्लिफर्ड यांनी करुन दिली.

अमेरिकेने पाकिस्तानबरोबरची मैत्री तोडण्याची वेळ आली आहे - अमेरिकी विश्‍लेषकाचा इशारातालिबान, अल कायदा व इतर दहशतवादी संघटनांना कायम पाठिशी घालणार्‍या पाकिस्तानला अमेरिकेने नाटोचा सहकारी देश म्हणून दर्जा दिला. २००२ ते २०१८ या कालावधीत अमेरिकेने पाकिस्तानला ३३ अब्ज डॉलर्सचे सहाय्य दिले. पण याचा वापर दहशतवादविरोधी कारवाईसाठी न करता, दहशतवाद्यांना पोसण्यासाठीच केला, अशी घणाघाती टीका क्लिफर्ड यांनी केली. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे आर्थिक सहाय्य रोखून महत्त्वाची भूमिका घेतली होती. पण राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना चुका सुधारायच्या असतील, तर याहून मोठे पाऊल उचलावे लागेल, असे क्लिफर्ड यांनी सुचविले.

अमेरिकेने मैत्री तोडली तर पाकिस्तान अमेरिकेचे कडवे शत्रू असलेल्या चीन, इराण या राजवटीबरोबरच तालिबान, अल कायदा व इतर दहशतवादी संघटनांच्या कुशीत जाऊन बसेल. पण याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नसल्याची जाणीव क्लिफर्ड यांनी आपल्या लेखातून करुन दिली.

leave a reply