तालिबानसारख्या धोक्याचा सामना करण्यासाठी सुरक्षादलांना प्रशिक्षण

सामना करण्यासाठीनवी दिल्ली – अफगाणिस्तानात तालिबानच्या राजवटीनंतर सीमेवर तैनात भारतीय सुरक्षादलांना, तसेच दहशतवादविरोधी मोहिमेमध्ये सहभागी सुरक्षा यंत्रणांना तालिबानसारख्या धोक्याशी सामना करण्यासाठी प्रशिक्षित होण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. वीस वर्षांपूर्वी अफगाणिस्तानात तालिबान राजवट असताना भारतातही दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली होती. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी संघटनांना तालिबानच्या राजवटीच्या काळात बळ मिळाले होते. तसेच शेजारील बांगलादेशातही अशा दहशतवादी संघटना उदयास आल्या होत्या. या संघटनांनी भारतातही कारवाया केल्या होत्या. त्यामुळे संरक्षण तज्ज्ञही या धोक्याची वारंवार जाणीव करून देत आहेत. या पार्श्‍वभूमीवर काही दिवसांपूर्वी सरकारने सुरक्षादलांना या धोक्याशी सामना करण्यासाठी सज्ज होण्याचे आदेश दिल्याचे वृत्त आहे.

तालिबानने गेल्या महिन्यात अफगाणिस्तानातील बहुतांश प्रांतावर सहज ताबा मिळविला होता. तालिबानच्या अफगाणिस्तानातील ताब्यामुळे दक्षिण व मध्य आशियातील भूराजकीय परिस्थितीवर परिणाम होणार असून भारताच्या सीमेवर आणि अंतर्गत भागातही याचा गंभीर परिणाम दिसण्याची भीती व्यक्त केली जाते. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सुरक्षादलांना आता प्रशिक्षित होण्याची गरज आहे. त्यांना नवे डावपेच, धोरण आखण्याची आवश्यकता आहे. तसेच सुरक्षादलांच्या जवानांना तालिबानसारख्या धोक्याशी सामना करण्यासाठी प्रशिक्षण देण्याची गरज भासत आहे. त्यामुळे केंद्रीय सुरक्षा संस्थांनी सुरक्षादलांना आपल्या जवानांना हा धोका ओळखून प्रशिक्षित करण्याचे निर्देश दिले आहेत.

सामना करण्यासाठीपाकिस्तानला लागून असलेल्या भारताच्या पश्‍चिम सीमेवर, त्याचबरोबर पूर्व सीमेवरही परदेशी दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्याचे मोठे आव्हान असेल. सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि सीमा सुरक्षा बलाकडे (एसएसबी) पश्‍चिम व उत्तर सीमेवर सुरक्षेची जबाबदारी आहे. तसेच दहशतवादविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या पोलीस दलांनाही बदलत्या परिस्थिती निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी प्रशिक्षित करण्यात यावे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. केंद्रीय राज्य राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि जम्मू-काश्मीर पोलीस मोठ्या प्रमाणावर दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये सहभागी आहेत.

एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या महितीनुसार काही दिवसांपूर्वीच या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर सीमेवरील बदलत्या स्थितीबाबत बीएसएफ, एसएसबी, सीआरपीएफ व जम्मू-काश्मीर पोलिसांचा प्रशिक्षण कार्यक्रम अद्ययावत करण्यात येत आहे. तालिबान संबंधीत माहिती व त्याच्या लढण्याच्या पद्धतीचाही या जवानांसाठी तयार करण्यात येत असलेल्या अभ्यासक्रमात समावेश केला जात आहे. केंद्रीय सुरक्षा दलांच्या सर्वच श्रेणीतील अधिकार्‍यांना प्रशिक्षित करण्यात येणार असून यासाठी अधिकार्‍याकरीत वेबिनारही आयोजित करण्यात येत आहेत, असेही या अधिकार्‍याने सांगितले.

leave a reply