निर्वासितांचे लोंढे रोखण्यासाठी पोलंडकडून बेलारुसच्या सीमेवर लष्कर तैनात

निर्वासितांचे लोंढेवॉर्सा/मिन्स्क – बेलारुसमधून येणारे निर्वासितांचे लोंढे रोखण्यासाठी पोलंडने सीमाभागात लष्कर तैनात केले आहे. पोलंडचे संरक्षणमंत्री मारिउस्झ ब्लॅस्झाक यांनी ‘पोलंड-बेलारुस’ सीमेवर 900 जवान तैनात केल्याची माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच पोलंडने, निर्वासितांच्या माध्यमातून बेलारुस युरोपिय महासंघाविरोधात ‘हायब्रिड वॉर’ खेळत असल्याचा इशारा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर लष्करी तैनाती महत्त्वाची ठरते.

युरोपिय महासंघाने बेलारुसचे सर्वेसर्वा अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्यासह सरकारवर कडक निर्बंध लादले आहेत. लुकाशेन्को यांना विरोध करणाऱ्या नेत्यांना काही युरोपिय देशांनी आश्रयही दिला असून बेलारुसवर दडपण टाकण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. महासंघाच्या या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी बेलारुसने निर्वासितांचा वापर सुरू केल्याचे समोर येत आहे. गेल्या दोन महिन्यात लिथुआनियात जवळपास चार हजार निर्वासितांनी घुसखोरी केल्याचे उघड झाले आहे. तर या महिन्यात दोन हजारांहून अधिक निर्वासितांनी घुसखोरी केल्याची माहिती पोलंडने दिली आहे.

बेलारुस रशियाच्या सहाय्याने निर्वासितांचे लोंढे घुसवित असल्याचे दावेही समोर आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर लिथुआनिया व पोलंड या दोन्ही देशांनी सीमेवरील घुसखोरी करण्यासाठी अतिरिक्त पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. लिथुआनियाने यापूर्वीच सीमेवर नवे कुंपण उभारण्यास सुरुवात केली असून अतिरिक्त सुरक्षादलेही तैनात केली आहेत. पोलंडनेही आता त्याच स्वरुपाची पावले उचलत जवळपास 900 जवान बेलारुस सीमेवर तैनात केले आहेत. पोलिश यंत्रणांकडून सीमेवर निर्वासितांचे लोंढेतारांचे कुंपण घालण्यासही सुरुवात झाल्याची माहिती पोलंडकडून देण्यात आली.

बेलारुसकडून पोलंडमध्ये घुसविण्यात येणाऱ्या निर्वासितांमागे ऑलिंपिक खेळाडूच्या आश्रयाचाही मुद्दा असल्याचे मानले जाते. काही दिवसांपूर्वी टोकिओ ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी झालेल्या क्रिस्तसिना त्सिमानोस्काया या बेलारुसच्या महिला धावपटूने पोलंडच्या दूतावासात प्रवेश करून खळबळ उडवली होती. या घटनेनंतर पोलंडच्या सरकारने क्रिस्तसिनाला मानवतावादी भूमिकेतून आश्रय देण्याचा निर्णय घेतला होता. या घटनेनंतर बेलारुस-पोलंड सीमेवरील निर्वासितांचे लोंढे वाढण्यास सुरुवात झाल्याचा दावा पोलंडकडून करण्यात आला आहे.

बेलारुसकडून पोलंड व लिथुआनियात घुसविण्यात येणाऱ्या निर्वासितांच्या मुद्याची युरोपिय महासंघाने गंभीर दखल घेतली आहे. या मुद्यावर बुधवारी महासंघाची बैठक झाली असून त्यात बेलारुस निर्वासितांचा राजकीय हेतूने वापर करीत असल्याचा उघड आरोप करण्यात आला. त्याचवेळी महासंघाकडून बेलारुसवर अतिरिक्त निर्बंध लादण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

leave a reply