माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची अमेरिकेच्या ‘लिबरल मीडिया’वर जळजळीत टीका

वॉशिंग्टन – ‘विस्कॉन्सिन प्रांतात झालेल्या एका कार्यक्रमातील ‘लाईव्ह स्ट्रीम’दरम्यान ट्रम्प यांनी आपल्यावर टीका करणार्‍या ‘लिबरल मीडिया’ला चांगलेच धारेवर धरले. ‘मी जी काही वक्तव्ये करीत होतो, ती सर्व खरी ठरत आहेत. हायड्रोक्सिक्लोरोक्वाईन कोरोनावरील प्रभावी ठरले आहे. कोरोनाव्हायरस चीनच्या लॅबमधूनच आल्याची माहिती समोर येत आहे’, असे सांगून आपले आरोप नाकारणार्‍या माध्यमांचा ट्रम्प यांनी चांगलाच समाचार घेतला.

तसेच बायडेन यांचे हितसंबंध चीनशी जोडलेले आहेत, त्यांच्या मुलाच्या लॅपटॉपमध्ये याची माहिती असल्याचे आरोप झाले होते. ही माहिती खरी निघाली. पण त्याकडे दुर्लक्ष करून ट्रम्प यांना निवडणुकीत रशियाने सहाय्य केल्याचे आरोप अमेरिकन माध्यमांनी उचलून धरले होते. ट्रम्प यांना लक्ष्य करणार्‍या अमेरिकन माध्यमांनी, तालिबानला पैसे पुरवून रशिया अमेरिकन सैनिकांचा बळी घेत असल्याचा आरोप लगावला होता. पण ती फेक न्यूज असल्याचे स्पष्ट झाले. या सार्‍या गोष्टींकडे ट्रम्प यांनी लक्ष वेधून आपल्या विरोधातील माध्यमांनी केलेल्या कटाची जाणीव अमेरिकन जनतेला करून दिली.माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची अमेरिकेच्या ‘लिबरल मीडिया’वर जळजळीत टीका

तसेच अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी निर्वासितांच्या मुद्यावरून बायडेन प्रशासनावर तोफ डागली. माझ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकिर्दीत आखण्यात आलेली सीमेच्या सुरक्षेसंदर्भातील धोरणे महत्त्वाची होती व त्यांना यशही मिळाले होते, असा दावा ट्रम्प यांनी केला. अमेरिकेच्या इतिहासात एकेकाळी सर्वाधिक सुरक्षित झालेली सीमा आता सर्वाधिक धोकादायक व भयानक बनली आहे. अमली पदार्थांचे साठे मोठ्या प्रमाणात अमेरिकेत येत आहेत आणि मानवी तस्करीही सुरू झाली आहे, अशी जळजळीत टीका माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली.

अमेरिकेत पुढच्या वर्षी संसदेच्या प्रतिनिधीगृहासाठी निवडणूक होणार असून त्याच्या प्रचारमोहिमेला सुरुवात झाली आहे. त्याचा एक भाग म्हणून शनिवारी ट्रम्प यांनी विस्कॉन्सिनमधील एका सभेला ‘लाईव्ह व्हिडिओ स्ट्रीम’च्या माध्यमातून संबोधित केले. यावेळी त्यांनी लिबरल मीडिया व बायडेन प्रशासनाविरोधात टीकेच्या जोरदार फैरी झाडल्या. याच पार्श्‍वभूमीवर ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना पाठविलेल्या एका ईमेलमध्ये 2020 सालच्या राष्ट्राध्यक्षपदाचा निवडणुकीत गैरव्यवहार झालेल्या आरोपांचाही पुनरुच्चार केला आहे.

या ईमेलमध्ये ट्रम्प यांनी 2020 सालच्या निवडणुकीचा उल्लेख ‘क्राईम ऑफ द सेंच्युरी’ अर्थात या शतकातील सर्वात मोठा गुन्हा, असा असा केला आहे. त्याचवेळी अमेरिकेच्या न्यायविभागाला लवकरच या निवडणुकीतील गैरव्यवहारांच्या चौकशीचा निर्णय घ्यावाच लागेल, अशी आग्रही मागणी ट्रम्प यांनी केली आहे. दरम्यान, कोरोनाच्या उगमाबाबत ट्रम्प यांनी चीनवर केलेले आरोप नाकारून आम्ही चूक केली, अशी कबुली अमेरिकेतील उदारमतवादी पत्रकारांनी दिली आहे. मात्र त्याआधी त्यांनी केलेल्या अपप्रचाराचा अमेरिकेच्या निवडणुकीवर परिणाम झाला, असा प्रहार अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी केला. माध्यमांनी कोरोनाबाबतच्या खर्‍या बातम्या छापल्या असत्या, तर आज ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असते, असे ग्रॅहम यांनी म्हटले आहे.

leave a reply