ट्रम्प व पुतिन यांच्यात शस्त्रास्त्रबंदी, इराणच्या मुद्द्यांवर चर्चा

वाशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात फोनवरुन चर्चा पार पडली. यावेळी सामरिक स्थैर्य, शस्त्रास्त्रबंदी, इराण, कोरोनाव्हायरस आणि इतर महत्त्वांच्या मुद्द्यांवर चर्चा पार पडल्याची माहिती दोन्ही देशांनी प्रसिद्ध केली. गेल्या पाच आठवड्यांमध्ये ट्रम्प आणि पुतिन यांच्यात झालेली ही दुसरी चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरात वेगाने सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील या चर्चेकडे पाहिले जाते.

आंतरराष्ट्रीय शांती व सुरक्षेची विशे़ष जबाबदारी अमेरिका आणि रशियावर आहे. म्हणूनच सामरिक स्थैर्य आणि शस्त्रास्त्रबंदी या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये सखोल चर्चा झाल्याचे रशियन सरकारने जाहीर केले. तर शस्त्रास्त्रबंदीच्या मुद्द्यावर अमेरिका आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये प्रदीर्घ चर्चा पार पडल्याचे व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जुड डिरे यांनी सांगितले. ’येत्या काळात अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यात शस्त्रस्पर्धा भडकू नये, यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी यावेळी आवाहन केले. तसेच व्हिएन्ना येथील बैठकीत शस्त्रास्त्रबंदीच्या प्रयत्नांना यश मिळावे, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला’, असेही व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

याआधीही अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्रांची संख्या कमी करण्यासंदर्भातील “स्टार्ट” या शस्त्रास्त्रबंदीच्या करारामध्ये अमेरिका व रशियाबरोबर चीनलाही सहभागी करुन घ्यावे, अशी मागणी रा़ष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली होती. स्टार्ट अंतर्गत अमेरिका व रशिया आपल्या क्षेपणास्त्रांच्या संख्येत कपात करीत असताना, अमेरिकेने चीनवर आपल्या क्षेपणास्त्रांची संख्या वाढविल्याची टीका केली होती. त्यामुळे भविष्यातील स्टार्ट करारात चीनचाही समावेश असावा. चीनला या करारात सहभागी केल्याशिवाय अमेरिका शस्त्रास्त्रबंदी करणार नसल्याची भूमिका, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्वीकारली होती. पण चीनने अमेरिकेची ही मागणी फेटाळली होती. या पार्श्वभूमीवर, पुतिन यांच्याबरोबरील चर्चेत ट्रम्प यांनी चीनचा मुद्दा उपस्थित केल्याचे दिसत आहे.

त्याचबरोबर इराणचा अणुकार्यक्रम, निर्बंध यावरही ट्रम्प आणि पुतिन यांच्यात महत्त्वाची चर्चा पार पडल्याची माहिती क्रेमलिनने दिली. पुढच्या काही आठवड्यांमध्ये इराणवर लादलेल्या निर्बंधांची मुदत संपुष्टात येत आहे. पण इराणवरील निर्बंधांची मुदत वाढविण्यात यावी, अशी मागणी अमेरिकेने संयुक्त राष्ट्रसंघाकडे केली आहे. तर रशिया आणि चीनने नकाराधिकार वापरुन अमेरिकेचा निर्बंधांचा प्रस्ताव धुडकविण्याची तयारी केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थायी सदस्यांची पुढची बैठक रशिया आयोजित करणार आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी चर्चा केल्याचा दावा केला जातो. या व्यतिरिक्त कोरोनाव्हायरसविरोधातील लढा, दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनवि़षयक घडामोडी यांच्यावरही चर्चा झाल्याचे जाहीर करण्यात आले.

गेल्या आठवड्यात चीनकडून इराणमध्ये ४०० अब्ज डालर्सच्या गुंतवणूकीची घोषणा करण्यात आली. या गुंतवणूकीबरोबर चीन आखातातील आपला प्रभाव वाढवित असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर अमेरिका आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये झालेली ही चर्चा महत्त्वाची ठरत आहे. दरम्यान, गेल्या चार महिन्यांमध्ये ट्रम्प आणि पुतिन यांच्यात पार पडलेली ही तिसरी चर्चा आहे. गेल्या महिन्यात ट्रम्प यांनी पुतिन यांना फोन करुन जी-७ च्या बैठकीचे आमंत्रण दिले होते. या बैठकीतून चीनला वगळून भारत, रशियाला सहभागी करण्याचा प्रस्ताव राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या मित्रदेशांसमोर मांडला होता.

leave a reply