अफगाणिस्तानात तैनाती ठेवणार्‍या तुर्कीने गंभीर परिणामांसाठी तयार रहावे

- तालिबानची धमकी

काबुल – वारंवार इशारे देऊनही काबुलमधील सैन्यतैनातीवर ठाम असणार्‍या तुर्कीला आपल्या निर्णयासाठी गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी तालिबानने दिली. गेल्या महिन्याभरात तालिबानने तुर्कीला तिसर्‍यांदा धमकावले. पण तुर्की काबुल विमानतळावरील आपल्या सैन्यतैनातीवर ठाम असल्याच्या बातम्या अमेरिकी माध्यमे देत आहे.

अफगाणिस्तानात तैनाती ठेवणार्‍या तुर्कीने गंभीर परिणामांसाठी तयार रहावे- तालिबानची धमकीअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अफगाणिस्तानातून सैन्यमाघारीची घोषणा केल्यानंतर नाटो सदस्य देशांनी तातडीने आपले जवान मायदेशी रवाना केले. पण तुर्कीने पुढील काही महिने आपले जवान राजधानी काबुलमध्ये तैनात असतील, अशी घोषणा केली. येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेसाठी ही तैनाती असेल, असा दावा तुर्कीने केला.

पण तालिबानचे नेतृत्व तुर्कीच्या या तैनातीशी सहमत नाही. इस्लामी असला तरी नाटोचा सदस्य देश असलेल्या तुर्कीने आपल्या सहकारी देशांसह माघार घ्यावी, असे तालिबानने याआधीच्या दोन इशार्‍यांमध्ये बजावले होते. पण तुर्की आपल्या इशार्‍यांना किंमत देत नसल्याचे पाहून तालिबानने तुर्कीला स्पष्ट शब्दात धमकावले.

‘अफगाणिस्तानात सैन्यतैनाती कायम ठेवण्याचा तुर्कीचा निर्णय निंदनीय ठरतो. अजूनही तुर्कीने आपल्या निर्णयात बदल केला नाही आणि आमच्या देशातील घुसखोरी कायम ठेवली तर याच्या यापुढील परिणामांना तुर्की जबाबदार असेल’, अशी धमकी तालिबानने दिली.

दरम्यान, तुर्कीला जगभरात आपले लष्करी तळ प्रस्थापित करायचे आहेत व त्यासाठी एर्दोगन यांची राजवट अस्थिर असलेल्या देशांमध्ये आपले जवान तैनात करीत असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक करीत आहेत. तुर्कीने याआधी लिबियामध्ये असेच केले असून अफगाणिस्तानातील तैनाती याचाच भाग असल्याचे या विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. लिबियाप्रमाणे तुर्की अफगाणिस्तानात कंत्राटी जवान किंवा सिरियातील दहशतवादी देखील तैनात करू शकतो, असा इशारा या विश्‍लेषकांनी दिला होता.

leave a reply