निर्वासितांच्या बोटी घुसवून तुर्की चिथावणी देण्याचा प्रयत्न करीत आहे

- ग्रीसच्या मंत्र्यांचा आरोप

अथेन्स/अंकारा – तुर्की निर्वासितांच्या बोटी घुसवून ग्रीसला चिथावणी देण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप ग्रीसचे ‘मायग्रेशन मिनिस्टर’ नोतिस मिताराकिस यांनी केला आहे. गेल्या वर्षी तुर्की जाणुनबुजून हजारो निर्वासितांना ग्रीसच्या सीमेकडे ढकलत असल्याचे सॅटेलाईट फोटोग्राफ्सवरून उघड झाले होते. त्यानंतर ग्रीसने निर्वासितांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात कुंपण उभारून अतिरिक्त सुरक्षादले तैनात केली होती. मात्र त्यानंतरही तुर्कीकडून कारवाया सुरू असून यामुळे दोन देशांमधील तणाव अधिकच चिघळण्याचे संकेत मिळत आहेत.

ग्रीस व तुर्कीमध्ये भूमध्य सागरातील इंधनक्षेत्राच्या मुद्यावरून प्रचंड तणाव आहे. तुर्कीने सातत्याने आपली जहाजे ग्रीसच्या हद्दीनजिक पाठवून तसेच धमक्या देऊन ग्रीसला चिथावणी द्यायचा प्रयत्न चालविला आहे. ग्रीसने त्याविरोधात आक्रमक भूमिका घेऊन तुर्कीला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लष्करी तैनाती केली आहे. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय स्तरावरून तुर्कीवर दडपण आणण्यातही ग्रीस यशस्वी ठरला असून, युरोपिय महासंघाने याच मुद्यावरून तुर्कीवर निर्बंधही लादले आहेत.

काही दिवसांपूर्वी युरोपातील पाच देशांनी एकत्र येऊन तुर्कीच्या कारवाया रोखण्यासाठी युरोपिय महासंघाने आक्रमक भूमिका घ्यावी, अशी मागणी केली होती. त्यावर तुर्कीकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. आता निर्वासितांचा वापर करून ग्रीस व युरोपिय महासंघावर दबाव आणण्याचे प्रयत्न तुर्कीने सुरू केल्याचे दिसत आहे. २०१६ साली युरोप व तुर्कीत झालेल्या करारानुसार, युरोपमध्ये येणार्‍या निर्वासितांच्या लोंढ्यांना आश्रय देण्याची जबाबदारी तुर्कीवर सोपविण्यात आली होती. त्यासाठी तुर्कीला अर्थसहाय्य देण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर व्यापारी सवलतीही पुरविण्यात आल्या होत्या. पण तुर्कीने याचा गैरफायदा घेऊन आपल्याकडील निर्वासितांचा वापर युरोपविरोधातील शस्त्र म्हणून करण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या वर्षीच तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी लाखो निर्वासितांचे लोंढे युरोपवर सोडू, असे धमकावले होते. या पार्श्‍वभूमीवर ग्रीसच्या मंत्र्यांनी तुर्कीवर केलेला नवा आरोप लक्ष वेधून घेणारा ठरतो. ‘तुर्कीचे नौदल व तटरक्षक दल निर्वासितांच्या बोटी युरोपच्या हद्दीत घुसविण्यासाठी साथ देत आहे. ग्रीसच्या तटरक्षक दलाने अशा शुक्रवारी अशा अनेक घटनांनी नोंद घेतली आहे. या घटना ग्रीसला चिथावणी देण्याचा प्रयत्न आहे. तुर्कीने हे प्रकार तात्काळ थांबवावेत आणि चिथावणी देण्याचे टाळावे’, असे ग्रीसचे ‘मायग्रेशन मिनिस्टर’ नोतिस मिताराकिस यांनी बजावले.

मात्र तुर्कीने आपल्यावरील आरोप फेटाळले असून ग्रीसचे मंत्री चुकीची माहिती देत असल्याचा दावा केला. ‘ग्रीसनेच २३१ निर्वासितांना माघारी पाठविले असून हा मानवतेविरोधातील गुन्हा ठरतो’, असे तुर्कीचे अंतर्गत सुरक्षा उपमंत्री इस्माईल काताक्लि यांनी सांगितले. तुर्कीच्या तटरक्षक दलानेही आपण ग्रीसने माघारी धाडलेल्या निर्वासितांची सुटका केल्याचे म्हटले आहे.

leave a reply