तुर्कीच्या हल्ल्यात इराकमध्ये ६० ठार

- इराकने तुर्कीच्या राजदूतांना समन्स बजावले

इस्तंबूल/बगदाद – तुर्कीच्या लष्कराने इराकमध्ये घुसून उत्तरेकडील भागात चढविलेल्या हल्ल्यांमध्ये ६० जण ठार झाले आहेत. यामध्ये ५३ कुर्द दहशतवाद्यांचा समावेश असल्याचा दावा तुर्कीचे संरक्षणमंत्री हुलूसी अकार यांनी केला. कुर्दांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सिरियाप्रमाणे इराकमधील लष्करी तळ ताब्यात घेणार असल्याची घोषणा तुर्कीने केली आहे. यामुळे संतापलेल्या इराकने तुर्कीच्या राजदूतांना समन्स बजावले आहेत.

दहा दिवसांपूर्वी तुर्कीने इराकच्या उत्तरेकडील कुर्दिस्तान भागात ‘पेन्स-सिमसेक’ अर्थात ‘ऑपरेशन क्लॉ लाईट्निंग’ आणि ‘पेन्स-यिल्दिरीम’ अर्थात ‘ऑपरेशन क्लॉ थंडरबोल्ट’ अशा दोन लष्करी मोहिमा छेडल्या आहेत. तुर्कीने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेल्या ‘कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी-पीकेके’चे दहशतवादी या भागात तळ ठोकून असल्याचा आरोप एर्दोगन सरकारने केला होता. आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी आव्हान ठरू लागलेल्या ‘पीकेके’चे दहशतवादी इराकच्या कुर्दिस्तान प्रांतात दडल्याचा दावा करून तुर्कीने या भागात हल्ले सुरू केले होते.

गेल्या दहा दिवसांच्या मोहिमेमध्ये पीकेकेचे ५३ दहशतवादी मारले असून यामध्ये एका वरिष्ठ कमांडरचा समावेश असल्याचा दावा तुर्कीचे संरक्षणमंत्री अकार यांनी केला. याशिवाय या संघर्षात तुर्कीचे सात जवानही मारले गेल्याची माहिती समोर येत आहे. तसेच यापुढेही पीकेके व त्यांच्या समर्थकांवरील कारवाई सुरू राहणार असल्याची घोषणा तुर्कीच्या संरक्षणमंत्र्यांनी केली.

पीकेकेच्या दहशतवाद्यांवरील कारवाईत १६ शस्त्रे आणि मोठा दारुगोळा हस्तगत केला. याशिवाय सोव्हिएत काळातील दोन ‘डीएसएचके’ जड मशिन गन, कॅलेशनिकोव्ह रायफल्स हस्तगत केली आहेत. हा शस्त्रसाठा अमेरिका व रशियन बनावटीचा असल्याचा ठपका तुर्कीच्या संरक्षणमंत्र्यांनी ठेवला. ‘दुर्दैवाने तुर्कीचे काही मित्रदेशच या दहशतवाद्यांना क्षेपणास्त्रे व इतर शस्त्रास्त्रे पुरवित आहेत. त्यामुळे हे दहशतवादी तुर्कीच्या सुरक्षेसाठी जास्त धोकादायक ठरतात’, असे सांगून संरक्षणमंत्री अकार यांनी अमेरिका व रशियाला नाव न घेता लक्ष्य केले.

तुर्कीचे अंतर्गत संरक्षणमंत्री सुलेमान सोयलू यांनी सत्ताधारी पक्षाच्या बैठकीत इराकमध्ये लष्करी तळ ताब्यात घेण्याची बाब बोलून दाखविली. ‘कुर्द दहशतवाद्यांच्या मुख्य ठिकाणांपर्यंत पोहोचायचे असेल तर इराकमधील कारवाई सुरू ठेवावी लागेल व त्यासाठी सिरियाप्रमाणे इराकमध्येही तुर्कीचा लष्करी तळ असणे आवश्यक आहे’, असे सोयलू यांनी म्हटले आहे. यासाठी इराकच्या कुर्दिस्तान प्रांतातील मेटीना तळाचा उल्लेख सोयलू यांनी केला.

तुर्कीच्या लष्कराने इराकमध्ये घुसून केलेली कारवाई आणि इराकच्या लष्करी तळाचा ताबा घेण्याचे संकेत दिल्याने तुर्कीच्या विरोधात इराकमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. इराकच्या सरकारने या प्रकरणी तुर्कीच्या राजदूतांना समन्स बजावले आहेत. तसेच कुर्दिस्तानमधील तुर्कीचे हल्ले इराकच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करणारे असल्याची टीका इराकच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली. तुर्कीच्या लष्कराने इराकमध्ये सुरू केलेल्या या हल्ल्यांचे पडसाद इराणच्या संसदेतही उमटले आहेत.

दरम्यान, गेल्या सात दशकांपासून पाश्‍चिमात्य देशांनी इराक, इराण, सिरिया आणि तुर्की या देशांमध्ये विखुरलेल्या कुर्दांना स्वतंत्र कुर्दिस्तान वसवून देण्याची स्वप्ने दाखविली होती. पण स्वतंत्र कुर्दिस्तानचा प्रश्‍न तडीस नेण्यासाठी पाश्‍चिमात्य देशांनी प्रयत्न केलेले नाहीत. यामुळे काही कुर्द संघटनांनी सशस्त्र लढा सुरू केला. इराकमध्ये स्वायत्त कुर्दिस्तानची निर्मिती झाली आहे. पण इराण, सिरिया व तुर्कीमधले कुर्द समुदाय आपल्या अधिकारांसाठी अजूनही लढा देत आहेत.

तुर्कीने पीकेके या कुर्द संघटनेला तसेच सिरिया व इराकमधील पीकेके संलग्न संघटनांना दहशतवादी घोषित केले आहे. त्याचबरोबर तुर्कीने सिरिया व इराकमधील कुर्दांविरोधात लष्करी मोहिम देखील छेडली आहे. तुर्कीच्या या कारवाईवर इराक, सिरियासह अमेरिका व रशियाकडूनही टीका होत आहे.

leave a reply