इराकमधील कुर्द विस्थापितांच्या शिबिरावर तुर्कीचे हवाई हल्ले

- तीन जणांचा बळी

अर्बिल – इराकच्या उत्तरेकडे कुर्द विस्थापितांसाठी उभारलेल्या शिबिरावर तुर्कीने चढविलेल्या ड्रोन हल्ल्यात तिघांचा बळी गेला तर दोन जण जखमी झाले. तुर्कीतील एर्दोगन राजवटीच्या छळाला कंटाळून इराकमध्ये आश्रय घेतलेल्या कुर्दांसाठी हे शिबिर उभारण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी कुर्दांचे हे शिबिर नष्ट करण्याची धमकी दिली होती. विस्थापितांच्या शिबिरावर हल्ले चढविणार्‍या तुर्कीला या कारवाईसाठी आंतरराष्ट्रीय रोषाचा सामना करावा लागू शकतो.

इराकमधील कुर्द विस्थापितांच्या शिबिरावर तुर्कीचे ड्रोनचे हल्ले - तीन जणांचा बळीतुर्कीच्या दक्षिण आणि आग्नेय भागात कुर्दांची मोठी वस्ती होती. पण 1998 सालापासून तुर्कीतील कट्टरपंथियांकडून होणार्‍या छळाला कंटाळून हजारो कुर्द विस्थापितांनी इराकमध्ये धाव घेतली. तुर्कीच्या सीमेपासून 180 किलोमीटर अंतरावर असलेल्या इराकमधील ‘मखमूर’ या शिबिरात सुमारे 12 हजार कुर्दांची वस्ती आहे. पण मखमूर शिबिर म्हणजे आपल्या सुरक्षेला आव्हान देणार्‍या ‘कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी-पीकेके’ या तुर्कीतील बंडखोर संघटनेचे आश्रयस्थान असल्याचा आरोप तुर्की करीत आहे.

तुर्कीने पीकेकेला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी दोन दिवसांपूर्वी मखमूर शिबिराची तुलना पीकेकेच्या माऊंट कंदील येथील लष्करी तळाशी केली होती. ‘मखमूरवर वेळीच कारवाई केली नाही तर या ठिकाणाहून पीकेकेच्या दहशतवाद्यांचे मोठे केंद्र बनेल’, असा दावा करून राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी इराकमधील या शिबिरावर हल्ले चढविण्याची धमकी दिली होती. गुरुवारी येथे हल्ले चढवून तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी आपली धमकी प्रत्यक्षात उतरविली.

इराकमधील कुर्द विस्थापितांच्या शिबिरावर तुर्कीचे ड्रोनचे हल्ले - तीन जणांचा बळीतुर्कीच्या ड्रोनने शिबिरातील मुलांच्या बालवाडीजवळ हल्ला चढविल्याचा आरोप इराकच्या संसदेतील कुर्द नेत्याने केला. या हल्ल्यात बळी गेलेल्यांमध्ये मुलांचा समावेश आहे का, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण विस्थापितांच्या शिबिरावर हल्ला चढवून तुर्कीने भयंकर चूक केल्याची टीका या कुर्द नेत्याने केली. विस्थापितांच्या शिबिरावर चढविलेल्या या ड्रोन हल्ल्यासाठी तुर्कीवर कुर्दांबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरातून टीका होऊ शकते. गेल्याच महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघाने आपल्या अहवालात, तुर्कीच्या अनियंत्रित ड्रोन्सनी लिबियामध्ये नागरी वस्त्यांवर हल्ले चढविल्याचा आरोप केला होता. त्यामुळे तुर्कीची डोकेदुखी वाढू शकते.

दरम्यान, दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळात कुर्द समुदायाची पाच देशांमध्ये विभागणी झाली. इराक, इराण, तुर्की, सिरिया आणि आर्मेनिया या देशांमध्ये विखुरलेले कुर्दवंशिय स्वतंत्र कुर्दिस्तानची मागणी करीत आहेत. गेल्या सहा दशकांहून अधिक काळ पाश्‍चिमात्य देशांनी आपल्या राजकीय लाभासाठी कुर्दांचा वापर केला, असा आरोप केला जातो.

पण आता स्वतंत्र कुर्दिस्तानच्या निर्मितीखेरीज कुर्द स्वस्थ बसणार नाहीत, असे कुर्दांच्या बंडखोर संघटना आत्मविश्‍वासाने सांगू लागल्या आहेत. इराक व सिरियामधील कुर्दवंशिय यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. तर यापासून आपल्या एकसंघेतला धोका असल्याचे मानणार्‍या तुर्कीने इराकमध्ये घुसून कुर्दांवर हल्ले चढविण्याचे सत्र सुरू केले आहे. पुढच्या काळात तुर्कीला याचे परिणाम सहन करावे लागतील, असे संकेत कुर्दांचे नेते देत आहेत.

leave a reply