तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांकडून सिरियात नवी लष्करी मोहीम छेडण्याची घोषणा

नवी लष्करी मोहीमअंकारा – गेल्या ४८ तासांमध्ये सिरियाच्या उत्तरेकडील भागात झालेल्या हल्ल्यांमध्ये तुर्कीचे दोन जवान व तुर्कीसंलग्न संघटनेचे सहा दहशतवादी ठार झाले. यानंतर खवळलेले तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी सिरियातील कुर्द बंडखोरांविरोधात नवी लष्करी मोहीम छेडण्याची घोषणा केली. यापुढे तुर्कीच्या जवानांवरील हल्ले खपवून घेणार नसल्याचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी धमकावले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याबरोबर झालेल्या भेटीनंतर एर्दोगन यांनी ही धमकी दिली.

सिरियाच्या जझान भागात झालेल्या रॉकेट हल्ल्यात तुर्कीचे जवान ठार झाले. गेल्या काही वर्षांपासून तुर्कीच्या लष्कराने सिरियाच्या उत्तरेकडील कुर्दांच्या भागाचा ताबा घेऊन येथे आपले लष्करी तळ ठोकले आहेत. त्यामुळे सिरियातील कुर्द संघटनांकडून तुर्कीच्या जवानांवर हल्ले होत आहेत. रविवारी संध्याकाळी झालेल्या या रॉकेट हल्ल्यानंतर सोमवारी सिरियाच्या आफ्रिन शहरात झालेल्या कार बॉम्बस्फोटात सहा जण ठार झाले. हे सर्व सिरियातील तुर्कीसंलग्न दहशतवादी संघटनेचे सदस्य होते.

या दोन्ही हल्ल्यांसाठी सिरियातील ‘पिपल्स प्रोटेक्शन युनिट्स-वायपीजी’ जबाबदार असल्याचा ठपका तुर्कीने ठेवला आहे. याशिवाय सिरियाच्या जाराबुलूस शहरातून तुर्कीच्या गाझियानटेप भागावर दोन रॉकेट हल्ले झाल्याचाही दावा केला जातो. यानंतर मंगळवारी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी आपल्या सुरक्षा अधिकार्‍यांची बैठक घेतली व सिरियातील कुर्द संघटनांविरोधात नवी लष्करी मोहीम छेडण्याची घोषणा केली.

नवी लष्करी मोहीम‘तुर्कीवर हल्ले चढविणार्‍या सिरियातील काही गटांबाबत तुर्कीने दाखविलेला संयम आता संपत आला आहे. सिरियामध्ये तैनात तुर्कीच्या लष्कराद्वारे या गटांविरोधात नवी लष्करी मोहीम छेडण्यात येईल किंवा दुसर्‍या पर्यायाचाही वापर केला जाईल’, असा इशारा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी दिला. तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी दुसर्‍या पर्यायाबाबत अधिक माहिती देण्याचे टाळले. पण सिरियात नवी लष्करी मोहीम छेडण्याचे जाहीर करून राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी सिरियातील कुर्द संघटनांविरोधात मोठी कारवाई करण्याचे स्पष्ट केले. सिरियातील कुर्द संघटनांना लक्ष्य करून तुर्की अमेरिकेला इशारा देत असल्याचा दावा केला जातो.

२०१६ साली ‘आयएस’विरोधी संघर्षात सहभागी झालेल्या तुर्कीने सिरियात सैन्य घुसविले होते. पण त्यानंतर तुर्कीची सिरियातील लष्करी कारवाई कुर्द संघटनांच्याच विरोधात होती, त्याचा आयएसवरील कारवाईशी संबंध नव्हता, असे आरोप होत आहेत. तुर्कीने कुर्दांच्या पीकेके तसेच वायपीजी या गटांना दहशतवादी संघटना जाहीर केले आहे. मात्र सिरियातील कुर्द संघटनांबाबत अमेरिकेची भूमिका तुर्कीपेक्षा खूपच वेगळी आहे. आयएसच्या दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी अमेरिका कुर्द दहशतवाद्यांचे सहाय्य घेत आहे. यामुळे अमेरिका व तुर्कीमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत सिरियात कुर्दांविरोधात नवी लष्करी मोहीम छेडण्याच्या तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या घोषणेवर अमेरिका कोणती भूमिका स्वीकारेल, याकडे विश्‍लेषकांची नजर लागलेली आहे.

leave a reply