नायजेरियाच्या सरकारची ट्विटरवर बंदी

अबुजा – नायजेरिया सरकारने सोशल नेटवर्किंग अ‍ॅप ‘ट्विटर’वर बंदी टाकली. सरकारच्या माहिती व सांस्कृतिक विभागाने शुक्रवारी एक निवेदन प्रसिद्ध करून ही माहिती दिली. ट्विटरच्या कारवाया नायजेरियाच्या ‘कॉर्पोरेट एक्झिस्टन्स’ला धोका उत्पन्न करीत असल्याचा ठपका ठेऊन बंदी लागू करण्यात येत असल्याचे या निवेदनात सांगण्यात आले आहे.

नायजेरियाच्या सरकारची ट्विटरवर बंदीमंगळवारी नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष मुहम्मदु बुहारी यांनी देशाच्या आग्नेय भागात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या मुद्यावर एक ट्विट केले होते. ‘नायजेरियातील अंतर्गत युद्धात झालेल्या जीवितहानी व प्रचंड नुकसानीबद्दल नव्या पिढीतील अनेकांना कल्पना नाही. आज गैरवर्तन करणार्‍या तरुणांना याची जाणीव असण्याची शक्यता नाही. आमच्यासारख्या अनेकांनी जवळपास 30 महिने रणांगणावर युद्ध लढले आहे. गैरवर्तन व हिंसा करणार्‍यांना कोणत्या प्रकारे प्रत्युत्तर द्यायचे हे आम्हाला चांगले ठाऊक आहे’, असा इशारा ट्विटमध्ये देण्यात आला होता. नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बुहारी यांनी या ट्विटमध्ये 1967 ते 70 या कालावधीत झालेल्या ‘नायजेरिया-बिआफ्रा वॉर’चा संदर्भ दिला होता. हा संदर्भ वापरून त्यांनी सध्या आग्नेय भागात हिंसा घडविणार्‍यांविरोधात आक्रमक कारवाई केली जाईल, असा संदेश ट्विटमधून दिला होता. याविरोधात अनेकांनी नाराजी व्यक्त करून आक्षेप नोंदविले होते. या आक्षेपांची दखल घेत ट्विटरने राष्ट्राध्यक्ष बुहारी यांचे ट्विट ‘डिलिट’ करून त्यांचा अकाऊंटही 12 तासांकरता निलंबित केला.

ट्विटरच्या या कारवाईवर नायजेरियन सरकारची तीव्र प्रतिक्रिया उमटली. नायजेरियाचे माहितीमंत्री लाय मोहम्मद यांनी ट्विटरवर जोरदार टीकास्त्र सोडले. ‘ट्विटरची भूमिका कायम दुटप्पी राहिली आहे. नायजेरियातील ट्विटरच्या कारवायाही संशयास्पद आहेत’, अशी टीका माहितीमंत्र्यांनी केली. त्यानंतर शुक्रवारी ट्विटरवर अनिश्‍चित काळासाठी बंदी घालण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. ट्विटरवर बंदी घालतानाच देशातील इतर सोशल मीडिया अ‍ॅप्सना नियंत्रित करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देशही सरकारकडून देण्यात आले आहेत.

गेल्या काही वर्षात आघाडीचे नेटवर्किंग अ‍ॅप म्हणून समोर आलेल्या ट्विटरकडून सातत्याने एकतर्फी निर्णय व दुटप्पी भूमिका घेण्यात येत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत. अमेरिका, युरोप व आशियाई देशांसह अनेक देशांमधून याबाबत सातत्याने सवाल उपस्थित करण्यात येत असून काही देशांनी कायदेशीर कारवाईही सुरू केली आहे. गेल्याच महिन्यात रशियातील न्यायालयाने ट्विटरला मोठ्या प्रमाणात आर्थिक दंड ठोठावला होता. जगातील आठ देशांनी आतापर्यंत ट्विटरवर बंदी टाकली असून त्यात ‘युएई’, सौदी अरेबिया, इजिप्त व चीनचा समावेश आहे.

leave a reply