महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधून आणखी दोन दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांनी उद्ध्वस्त केलेल्या दहशतवादी मॉड्यूल प्रकरणी शनिवारी आणखी दोन दहशतवाद्यांना अटक झाली आहे. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास मुंबई जोगेश्‍वरीतून एका दहशतवाद्याला पकडण्यात आले. तर उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधून या दहशतवादी कटातील आणखी एका फरार दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात आले. पाकिस्तानात प्रशिक्षण घेऊन आलेल्या ओसामा नावाच्या दहशतवाद्याचा तो काका असून दोनच दिवसांपूर्वी त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस बजावण्यात आली होती.

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधून आणखी दोन दहशतवाद्यांना अटकपाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना आयएसआयने भारतात दहशतवादी हल्ल्याचा रचलेला मोठा कट बुधवारी उघड झाला होता. ठिकठिकाणी छापे मारून पोलिसांनी सहा दहशतवाद्यांना अटक केली होती. तसेच मोठा शस्त्र व स्फोटकसाठा जप्त केला होता. पकडण्यात आलेल्या सहा दहशतवाद्यांमध्ये ओसामा उर्फ सामी आणि झिशान कमर हे दोन दहशतवादी पाकिस्तानात जाऊन दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेऊन आले होते. तसेच कुख्यात तस्कर दाऊद इब्राहिमच्या टोळीकडून टेरर फंडिंग होत होते, असा खुलासा झाला होता.

दहशतवाद्यांच्या चौकशीत या कटाबाबत आणखी काही धक्कादायक तपशील समोर आले होते. यामध्ये ओसामा नावाच्या दहशतवाद्याचा वडील उसैदूर उर रहमान आणि त्याचा काका उमैदूरही कटात सहभागी असल्याचे स्पष्ट झाले होते. आखाती देशात राहणार्‍या उसैदूरला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर उमैदूरचा शोध सुरू होता. त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस बजावण्यात आली होती.

उमैदूरला पकडण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी जोरदार मोहीम हाती घेतली होती. दिल्ली पोलीस, उत्तर प्रदेश पोलीसांसह इतर सुरक्षा यंत्रणा यासाठी समन्वयाने काम करीत होत्या. आपल्या पळण्याचे सर्व मार्ग बंद झाल्याचे लक्षात आल्यानंतर अखेरीस शुक्रवारी रात्री उमैदूर प्रयागराज येथील कारेली पोलीस ठाण्यात शरण आला. त्यानंतर त्याला लखनौमध्ये हलविण्यात आहे. येथे दिल्ली पोलिसांनी आपले विशेष पथक पाठवित उमैदूरला ट्रान्झीस्ट रिमांडवर आपल्या ताब्यात घेतले. झिशान कमरला दहशतवादी बनविण्यात या हूमैदूरचाच होता. तसेच ओसामा व कमरला पाकिस्तात पाठविण्याची सर्व व्यवस्था त्यानेच केल्याचे समोर आले होते. त्यामुळे उमैदूरच्या अटकेतून अनेक गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुंबईतील जोगेश्‍वरीमधून आणखी एका दहशतवाद्याला शनिवारी पहाटे अटक झाली. ही अटक दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मुंबई दहशतवादविरोधी पथकाने केली आहे. झकीर हसन शेख असे या दहशतवाद्याचे नाव असून तो शेजारी देशात सतत कोणाच्यातरी संपर्कात होता, असे समोर आले आहे. मुंबई एटीएसने झकीरला न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला २० सप्टेंबरपर्यंत एटीएस कोठडी दिली आहे. याआधी दिल्ली पोलिसांनी कोटामध्ये रेल्वेतून अटक केलेला जान मोहम्मद शेख हा सुद्धा मुळचा मुंबईतील धारावीतील होता. जान मोहम्मद शेख आणि झाकीर हे दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. त्यामुळे झाकीर सतत शेजारी देशात कोणाच्या संपर्कात होता, याचा उलगडा झाल्यास या कटाबद्दल आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

leave a reply