भारत व ऑस्ट्रेलियामधील ‘टू प्लस टू’ फलदायी ठरली

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

‘टू प्लस टू’नवी दिल्ली – भारत व ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री व संरक्षणमंत्र्यांची ‘टू प्लस टू’ चर्चा संपन्न झाली. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर व संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री मरिस पेन आणि संरक्षणमंत्री पीटर डटन यांच्यात पार पडलेल्या या चर्चेत धोरणात्मक सहकार्यावर विशेष भर देण्यात आला. लवकरच भारत व ऑस्ट्रेलियामध्ये मुक्त व्यापारी करार अपेक्षित आहे. चीनने ऑस्ट्रेलियाबरोबर व्यापारयुद्ध छेडलेले असताना, ऑस्ट्रेलियाबरोबरील भारताचे हे सहकार्य लक्षवेधी ठरते.

कोरोनाची साथ व आंतरराष्ट्रीय पातळीवरील वेगवान घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये ही चर्चा पार पडत आहे. अशा काळात भारत-ऑस्ट्रेलिया तसेच इतर समविचारी देशांनी आपले हितसंबंध जपण्यासाठीसहकार्य अधिकच भक्कम करण्याची गरज आहे. विशेषतः शांत, स्थीर व समृद्ध इंडो-पॅसिफिक क्षेत्राची हमी या सहकार्याद्वारे देता येईल, असा विश्‍वास यांनी या चर्चेच्या सुरूवातीला व्यक्त केला. भारत आपल्या निकटतम सहकारी देशांबरोबर अशी ‘टू प्लस टू’ चर्चा करीत आहे व त्यात ऑस्ट्रेलियाचा समावेश ही महत्त्वाची बाब ठरते, असे सांगून जयशंकर यांनी या द्विपक्षीय संबंधांचे महत्त्व अधोरेखित केले.

दोन्ही देशांमध्ये झालेली ही प्रत्यक्ष चर्चा अतिशय फलदायी ठरली, असे सांगून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी त्यावर समाधान व्यक्त केले. तसेच अफगाणिस्तानातील घडामोडी हा या चर्चेतील महत्त्वाच्या विषयांपैकी एक होता, याकडेही परराष्ट्रमंत्र्यांनी लक्ष वेधले. अफगाणिस्तानात सर्वसमावेशक सरकारची स्थापना व्हावी, अशी भारत व ऑस्ट्रेलियाची अपेक्षा असल्याचे परराष्ट्रमंत्री पुढे म्हणाले. त्याचवेळी क्वाडच्या सहकार्याचे जयशंकर व ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री मरिस पेन यांनी जोरदार समर्थन केले. क्वाडचे सहकार्य अत्यंत वेगाने व प्रभावीरित्या विकसित होत आहे व यासाठी भारताने घेतलेली आघाडी स्वागतार्ह ठरते, असे परराष्ट्रमंत्री पेन म्हणाल्या. सुरक्षा आणि विकासासाठी भारत व ऑस्ट्रेलियामध्ये विकसित होत असलेले सहकार्य इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी उपकार ठरेल. हे सहकार्य लवकरच नवी उंची गाठेल, असा विश्‍वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केला. या क्षेत्राचे स्थैर्य व शांतता यामध्ये भारतासह ऑस्ट्रेलियाचेही हितसंबंध गुंतलेले आहेत, असे सांगून संरक्षणमंत्र्यांनी दोन्ही देशांचे सहकार्य ही नैसर्गिक बाब ठरते, असे स्पष्ट केले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग व ऑस्ट्रेलियाचे संरक्षणमंत्री पीटर डटन यांच्या चर्चेत अफगाणिस्तानातील तालिबानच्या कारवाया, दहशतवाद व महिला आणि अल्पसंख्यांकांच्या अधिकारांचे मुद्दे होते.

दरम्यान, भारत व ऑस्ट्रेलिया चीनच्या इंडो-पॅसिफिक क्षेत्राती एकाधिकारशाहीच्या विरोधात ठाम भूमिका घेत आहेत. ऑस्ट्रेलियाला धडा शिकविण्यासाठी चीनने या देशावर आर्थिक निर्बंध लादून व्यापारयुद्ध छेडले आहे. भारताबरोबरील व्यापारी सहकार्य वाढवून ऑस्ट्रेलिया चीनला प्रत्युत्तर देत आहे. लवकरच भारत व ऑस्ट्रेलियामध्ये मुक्त व्यापारी करार संपन्न होईल, असे दावे केले जातात. या पार्श्‍वभूमीवर, दोन्ही देशांमध्ये झालेल्या ‘टू प्लस टू’ चर्चेचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

leave a reply