जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये दोन जवानांना वीरमरण

- निष्पाप नागरिकांच्या हत्यांमध्ये सहभागी दहशतवादी चकमकीत ठार

वीरमरणश्रीनगर – जम्मू काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील मेंढर उपविभागात दहशतवाद्यांबरोबरील चकमकीत दोन जवानांना वीरमरण आले. चारच दिवसांपूर्वी जम्मूमधील सीमेलगतच्या जंगलात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पाच जवान शहीद झाले होते. त्याचवेळी श्रीनगरमधील निष्पाप नागरिकांच्या हत्यांमध्ये सहभागी असलेला दहशतवादी पुलवामामध्ये चकमकीत ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच श्रीगरमध्येही सुरक्षादलांच्या कारवाईत आणखी एक दहशतवादी ठार झाला. आठवडाभरात जम्मू-काश्मीरमध्ये अकरा दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.

पुंछ जिल्ह्यातील सीमालगतच्या भागात दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळाल्यानंतर येथे व्यापक शोध मोहिम राबविली जात आहे. याच शोध मोहिमेदरम्यान सोमवारी ११ ऑक्टोबर रोजी दहशतवाद्यांनी अचानक केलेल्या गोळीबारात एका अधिकार्‍यासह पाच जवान शहीद झाले होते. तर शुक्रवारीही अशीच घटना मेंढरमधील नर खास येथील जंगलात घडली. सीमेपलीकडून घुसखोरी करून जम्मूमध्ये दाखल झालेल्या दहशतवाद्यांना नियंत्रण रेषेजवळील जंगलातच सुरक्षादलांनी घेरले आहे आणि मोठी शोधमोहिम राबविण्यात येत आहे. हे दहशतवादी मुगल रोडमार्गे काश्मिरमध्ये घुसण्याच्या तयारीत आहेत. मात्र सुरक्षादलांच्या मोहिमेमुळे त्यांना या जंगलातच लपून बसावे लागले आहे. गेल्या दहा दिवसांपासून हे दहशतवादी या जंगलात दडून बसले आहेत. हा जंगलभाग घनदाट असून तेथून दहशतवाद्यांना शोधून काढणे मोठे आव्हान आहे. सुरक्षादलाचे जवान निरनिराळी पथके बनवून ही शोधमोहिम राबवत आहेत. याच दरम्यान शुक्रवारी दहशतवादी आणि सुरक्षादलांचा आमनासामना झाला. दहशतवाद्यांनी अचानक केलेल्या गोळीबारात एक अधिकारी व एक जवान शहीद झाला. हे दोन्ही शहीद जवान मुळचे उत्तराखंडमधील आहेत. या गोळीबारानंतर दहशतवादी पुन्हा घनदाट जंगलांचा फायदा घेत येथून निसटण्यात यशस्वी ठरले.

गेल्या काही दिवसात दहशतवाद्यांच्या कारवायांमध्ये वाढ झाली आहे. जम्मू विभागातील उरी, राजौरी आणि पुंछ हे दोन जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या हालचाली दिसून येत आहेत. या नियंत्रण रेषेवरील जिल्ह्यांमध्ये सीमेपलीकडून घुसखोरीचे प्रयत्न होत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी उरीमध्ये चकमकीदरम्यान एका पाकिस्तानी दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले होते.

पुंछ व राजौरी या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या भागात ऑपरेशन सुरू आहेत. या दोन जिल्ह्यांमध्ये घुसखोरीच्या घटना वाढल्या असल्याचे दिसते. पाकिस्तानकडूनच या दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी सहाय्य करण्यात असल्याशिवाय हे शक्य नाही, असे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. जम्मू व काश्मीरमध्ये घुसखोरी घडवून दहशतवादी कारवायांचे नवे सत्र पाकिस्तानला सुरू करावयाचे आहे. या पार्श्‍वभूमीवर नुकताच केंद्रीय गृहमंत्र्यांनी पाकिस्तानला सज्जड इशारा दिला होता. पाकिस्तानात घुसून पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्यास भारत कचरणार नाही, असे त्यांनी बजावले होते.

leave a reply