दोन आठवड्यांचा काळ अमेरिकन जनतेसाठी अत्यंत खडतर असेल

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन  – ‘येणारे दोन आठवडे अतिशय क्लेशदायक असतील. या खडतर काळासाठी अमेरिकेने तयार रहावे. पुढचे ३० दिवस प्रत्येक अमेरिकी नागरिकाने मिळालेल्या सूचनांचे संपूर्णतः गांभिर्याने पालन करावे. कारण हा आपल्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे’, अशा शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनदेशबांधवांना कोरोनाव्हायरसच्या धोक्याची जाणीव करुन दिली आहे. व्हाईट हाऊसने या साथीचे अमेरिकेत एक ते अडीच लाख बळी जातील, अशी थरकाप उडविणारी शक्यता वर्तविल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकी जनतेला हा इशारा दिला आहे.

गेल्या चोवीस तासात अमेरिकेत कोरोनाव्हायरसच्या साथीत ८१२ जण दगावले असून अमेरिकेतील बळींची एकूण संख्या ४,३९४ वर गेली आहे. त्याचवेळी ४,८८८ रुग्णांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. अमेरिकेत या साथीचे २,००,२८९ रुग्ण असून गेल्या चोवीस तासात यामध्ये तब्बल ३६ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. अमेरिकेतील कोरोनाग्रस्त रुग्णांची एवढी मोठी संख्या असली तरी ८,७०७ जण या साथीतून बाहेर पडल्याचा दावाही केला जातो.

असे असले तरी, पुढचे दोन आठवडे अतिशय आव्हानात्मक असतील, याची जाणिव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मंगळवारच्या प्रेस ब्रिफींगद्वारे अमेरिकी जनतेला करुन दिली. अमेरिकी जनतेने महिनाभर घरात राहणे अत्यावश्यक असून मी स्वतः देखील पुढचे तीस दिवस व्हाईट हाऊसमधून बाहेर पडणार नाही, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट केले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेल्या या इशार्याच्या पार्श्वभूमीवर व्हाईट हाऊसने अधिक भेदक शब्दात अमेरिकन जनतेला परिस्थितिची जाणीव करुन दिली .

ही साथ रोखण्यासाठी ‘सोशल डिस्टन्स’ अर्थात इतरांपासून अंतर पाळण्याचे आवाहन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केले होते. पण कोरोनाव्हायरस ही महाभयंकर साथ असून या सूचनचे पालन केले तरी, ही साथ अमेरिकेत १,००,००० ते २,४०,००० जणांचा बळी घेईल, असे व्हाईट हाऊसने बजावले आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी किमान एक लाख जण या साथीत दगावतील, अशी शक्यता वर्तविली होती. मात्र, एवढी कठीण परिस्थिती आली तरी, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प संपूर्ण अमेरिकेत लॉकडाउन जाहीर करीत नसल्याची टीका अमेरिकी माध्यमे करीत आहेत.

न्यूयॉर्क प्रांतात या साथीचे सर्वाधिक बळी गेले असून याच्या रुग्णांची संख्याही याच प्रांतात अधिक आहे. या साथीने न्यूयॉर्क प्रांतात १,७०० हून अधिक जण दगावले असून या प्रांतात ७६ हजाराहून अधिक रुग्ण आहेत. तरीही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प किंवा न्यूयॉर्क प्रांताचे गव्हर्नर लॉकडाउन जाहीर करीत नसल्याची टीका सुरू आहे. अमेरिकेचे लोकप्रतिनिधी यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर घणाघाती हल्ले आहेत.

दरम्यान, अमेरिकेत या साथीचे १८ ते ४० वर्ष वयोगटातील सर्वाधिक रुग्ण असल्याची माहिती एका सर्वेक्षणातून समोर येत आहे.

leave a reply