संयुक्त अरब अमिरातचा ‘बराका’ अणुप्रकल्प कार्यान्वित

दुबई – गेल्या तीन वर्षांपासून प्रतिक्षित असलेला ‘बराका’ अणुप्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित झाल्याची घोषणा ‘संयुक्त अरब अमिरात’ने (युएई) केली. अरब देशांमधील हा पहिलाच अणुप्रकल्प ठरला आहे. दरम्यान, सदर अणुप्रकल्पामुळे या क्षेत्रातील तणाव अधिकच वाढेल, असा इशारा पाश्चिमात्य विश्लेषक देत आहेत.

दक्षिण कोरियाच्या तंत्रज्ञावर आधारीत असलेल्या बराका अणुप्रकल्पातील चार पैकी एक अणुभट्टी शनिवारी सुरू करण्यात आली. हा अणुप्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास ‘युएई’ची २५ टक्के वीजेची आवश्यकता पूर्ण होईल, असा दावा केला जातो. बराका अणुप्रकल्पाचे कार्यान्वित होणे हा युएईसाठी ऐतिहासिक दिवस असल्याची प्रतिक्रीया या देशाचे नेते देत आहेत. आपला हा अणुप्रकल्प पूर्णपणे नागरी वापरासाठी असल्याचे युएईचे म्हणणे आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अणुऊर्जा आयोगाने देखील युएईच्या या प्रकल्पाचे स्वागत केले.

पण बराका अणुप्रकल्प हा पर्यावरण आणि क्षेत्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याची टीका होत आहे. युएईचा शेजारी देश असलेल्या कतारने देखील सदर प्रकल्प आपल्या सुरक्षेला आव्हान देणारा असल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वी केला होता. युएईच्या या प्रकल्पामुळे आण्विक गळतीचा धोका वाढू शकतो, असेही कतारने म्हटले होते. युएईचा हा प्रकल्प क्षेत्रीय तणावात भर टाकणारा ठरेल, असा दावा ब्रिटनस्थित अभ्यासक पॉल डॉर्फमन यांनी केला आहे. बराका अणुप्रकल्प तयार करताना सुरक्षेचा विचार केला नसल्याची टीका डॉर्फमन यांनी केली आहे. या प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी हवाई सुरक्षा यंत्रणा नसल्याचे डॉर्फमन यांनी लक्षात आणून दिले होते.

दरम्यान, इराणच्या अणुकार्यक्रमावरुन आधीच या क्षेत्रात तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेने इराणच्या अणुकार्यक्रमाला लक्ष्य करण्यासाठी नवे कठोर निर्बंध लादण्याची तयारी केली आहे. तर इराणने देखील आपल्या अणुप्रकल्पांच्या सुरक्षेसाठी सज्ज असल्याची घोषणा केली आहे.

leave a reply