सौदी अरेबियाच्या पाठोपाठ युएईही पाकिस्तानकडून कर्ज वसूल करण्याच्या तयारीत

इस्लामाबाद – पाकिस्तानचे हवाई दलप्रमुख मुजाहिद अन्वर खान सध्या तुर्कीच्या दौर्‍यावर आहेत. आपल्या या भेटीत त्यांनी तुर्की व पाकिस्तान ही दोन राष्ट्रे व एकच देश असल्याची घोषणा करून टाकली. पाकिस्तान तुर्कीबरोबर वाढवित असलेल्या या जवळिकीचे पडसाद उमटत आहेत. कारण सौदी अरेबियाच्या पाठोपाठ संयुक्त अरब अमिरातीने देखील (युएई) पाकिस्तानला दिलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी तगादा लावला आहे.

Advertisement

कर्ज वसूल

सौदी अरेबियाने पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात असताना, २०१८ साली सुमारे ६.२ अब्ज डॉलर्सचे कर्ज या देशाला दिले होते. यापैकी तीन अब्ज डॉलर्सचे थेट कर्ज तर उरलेल्या ३.२ अब्ज डॉलर्सची इंधनाच्या खरेदीतील सवलतीच्या स्वरुपात सौदीकडून मिळाले होते. मात्र पाकिस्तानने काश्मीरच्या प्रश्‍नावर सौदी अरेबिया व युएईकडून सहाय्य मिळत नसल्या23:23:12चे आरोप करून या देशांवर घणाघाती टीका सुरू केली होती.

पाकिस्तानची माध्यमे सौदी व युएईसह इतर अरब देशांवरही जहरी टीका करू लागली होती. सोशल मीडियावर तर पाकिस्तानचे पत्रकार या दोन देशांना सातत्याने लक्ष्य करीत होते. हे सारे पाकिस्तानी सरकारच्या इशार्‍यानेच घडत असल्याचे सौदी-युएईचे म्हणणे होते. यानंतर संतापलेल्या सौदीने पाकिस्तानकडे दिलेल्या कर्जाच्या परतफेडीची मागणी केली. चीनकडून कर्ज घेऊन पाकिस्ताननेे सौदीचे एक अब्ज डॉलर्सचे कर्ज फेडले. सौदीचे बाकीचे कर्जही लवकरच फेडले जाईल, असे पाकिस्तानच्या सरकारने जाहीर केले आहे.

सौदीने केलेली ही मागणी सार्वजनिक करून पाकिस्तानच्या सरकारने फार मोठी घोडचूक केल्याचा इशारा या देशाचे माजी राजनैतिक अधिकारी देत आहेत. यामुळे सौदीबरोबर संबंध सुरळीत होण्याची शक्यता मावळल्याचे या माजी राजनैतिक अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत सौदीच्या पाठोपाठ युएई देखील पाकिस्तानकडे दिलेल्या कर्जाच्या परतफेडीची मागणी करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. हा सारा पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणात झालेल्या बदलाचा परिपाक असल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

पाकिस्तानने सौदी-युएई व इतर अरब देशांकडून आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य मिळवले. पाकिस्तानचे लाखो कामगार अरब देशांमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्याकडून मिळणार्‍या निधीवर पाकिस्तानची अर्थव्यवस्था बर्‍याच प्रमाणात अवलंबून आहे. तसेच इंधनासाठीही पाकिस्तान या देशांवर अवलंबून आहे. असे असूनही पाकिस्तानने सौदी-युएईची नाराजी पत्करून तुर्कीबरोबरील संबंध दृढ करण्याचे आत्मघातकी धोरण स्वीकारले आहे.

तुर्कीकडून पाकिस्तानाला पैसे मिळणार नाहीत आणि इंधनही मिळणार नाही. अशा परिस्थितीत तुर्कीशी जवळीक साधून पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार नक्की काय साधत आहे, असा प्रश्‍न पाकिस्तानी विश्‍लेषक विचारू लागले आहेत. पुढच्या काळात यामुळे पाकिस्तानवर फार मोठे आर्थिक संकट कोसळू शकते, असे या विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. मात्र आपली चूक मान्य करून ती सुधारण्याच्या ऐवजी इम्रान खान तुर्कीबरोबरील संबंध अधिकाधिक दृढ करीत चालले आहेत. पाकिस्तानच्या हवाई दलप्रमुखांचा तुर्की दौरा याचीच साक्ष देत आहे.

leave a reply