अफगाणिस्तानातून सैन्यमाघार घेतल्यानंतरही अमेरिका हल्ले करील

- सेंटकॉमच्या प्रमुखांची माहिती

वॉशिंग्टन – अमेरिकेने अफगाणिस्तानातून पूर्ण सैन्यमाघार घेतल्यानंतर या देशातील दहशतवादी ठिकाणांवरील हवाई हल्ले थांबणार नाहीत. ११ सप्टेंबरनंतरही अमेरिकेची अफगाणिस्तानातील हवाई कारवाई सुरूच राहिल, अशी माहिती अमेरिकेच्या सेंट्रल कमांड अर्थात सेंटकॉमचे प्रमुख जनरल फ्रँक मॅकॅन्झी यांनी दिली.

अफगाणिस्तानातील पूर्ण माघारीनंतर, या देशातील दहशतवादी अधिक आक्रमक होतील व अफगाणिस्तान पुन्हा दहशतवाद्यांच्या ताब्यात जाईल, असा दावा अफगाणी तसेच आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेची लढाऊ विमाने माघारीनंतरही आखात तसेच आशियाई देशांमधील आपल्या लष्करी तळांचा वापर करून अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर कारवाई करीत राहतील, असा विश्‍वास जनरल मॅकॅन्झी यांनी व्यक्त केला.

यासंबंधीची योजना तयार होत आहे. पुढच्या काही दिवसात संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांच्यासमोर ही योजना मांडली जाईल, अशी माहिती जनरल मॅकेन्झी यांनी अमेरिकन सिनेटला दिली.

leave a reply