अल कायदाला रोखण्यासाठी अमेरिका अफगाणिस्तानात हवाई हल्ले चढविल

- अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांचा दावा

अल कायदाला रोखण्यासाठीवॉशिंग्टन – अमेरिकेने सैन्यमाघार घेतली असली तरी अफगाणिस्तानकडे पाठ फिरविलेली नाही. येत्या काळात अल कायदाने अफगाणिस्तान डोके वर काढले तर अमेरिका नक्कीच हवाई हल्ले चढविल, असा इशारा अमेरिकिचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी दिला. गेल्या महिन्याभरात अमेरिकेने अफगाणिस्तानातील हवाई हल्ल्यासंबंधी दिलेला तिसरा इशारा ठरतो. पण अमेरिकन सिनेटर व सिनेटच्या समितीनेच संरक्षणमंत्री ऑस्टिन यांच्या या दाव्यावर शंका उपस्थित केली. ‘संरक्षणमंत्री ऑस्टिन यांचे दावे काल्पनिक ठरतात. कारण आखातातील लष्करी तळ किंवा अरबी समुद्रात विमानवाहू युद्धनौकेवरुन ड्रोन हल्ले चढविणे शक्य नाही’, ही बाब अमेरिकचे काही सिनेटर्स लक्षात आणून देत आहेत.

अल कायदाला रोखण्यासाठीअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अफगाणिस्तानबाबत घेतलेल्या निर्णयांवर अमेरिकेत जोरदार टीका होत आहे. अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन, संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले व सेंटकॉमचे प्रमुख जनरल मॅकेन्झी यांनी सिनेटच्या आर्म्ड्स सर्व्हिसेस कमिटीसमोर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या निर्णयांचे समर्थन करण्याचा जोरदार प्रयत्न केला. या सैन्यमाघारीनंतर अल कायदाने अफगाणिस्तानात पुन्हा डोके वर काढले तर? असा सवाल अमेरिकन सिनेटर्सनी केला.

यावर उत्तर देताना संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी अल कायदावर हवाई हल्ले चढविण्याचा पर्याय अजूनही उपलब्ध असल्याचे सांगितले. हा पर्याय कठीण असला तरी शक्य असल्याचा दावा ऑस्टिन यांनी केला. अफगाणिस्तानातून पूर्ण माघार घेतल्यानंतर अमेरिका अल कायदावर कसे हवाई हल्ले चढविणार? या प्रश्‍नावर उत्तर देण्याचे संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी टाळले. पण संरक्षणमंत्र्यांच्या या दाव्यावर अमेरिकन सिनेटर्स, माजी लष्करी अधिकारी आणि लष्करी विश्‍लेषकांनी सडकून टीका केली.

अल कायदाला रोखण्यासाठीहवाई हल्ल्यांचा दावा करणारे राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि संरक्षणमंत्री ऑस्टिन काल्पनिक कथा रंगवत असल्याची जळजळीत टीका सिनेटर माईक वॉल्ट्झ यांनी केली. अफगाणिस्तानात हवाई हल्ले चढविण्यासाठी अमेरिकेच्या ड्रोन्सना इराण किंवा पाकिस्तानची हवाईहद्द ओलांडावी लागेल. यामध्येच ड्रोन्सचे ७० ते ८० टक्के इंधन खर्च होईल, याची जाणीव निवृत्त मरिन्स अधिकारी वॉल्ट्झ यांनी करुन दिली. त्यामुळे आखाती देशांमधील लष्करी तळावरुन किंवा अरबी समुद्रात विमानवाहू युद्धनौकेवरुन अफगाणिस्तानात ड्रोन हल्ले चढविणे शक्य नसल्याचे वॉल्ट्झ यांनी लक्षात आणून दिले.

तर हवाई हल्ले चढविण्यासाठी अफगाणिस्तानच्या शेजारी देशांमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ नाही, याची आठवण निवृत्त नौदल अधिकारी व लष्करी विश्‍लेषक जेम्स होल्म्स यांनी करुन दिली. तरी देखील संरक्षणमंत्री ड्रोन हल्ले चढविणार असतील, तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असा टोला होल्म्स यांनी लगावला.

सिनेटर्स व निवृत्त लष्करी अधिकार्‍यांनी कात्रीत पकडल्यानंतर, संरक्षणदलप्रमुख मिले यांनी मध्य आशियातील लष्करी तळासाठी रशियाबरोबर चर्चा सुरू असल्याची माहिती दिली. यासंबंधी रशियन संरक्षणदलप्रमुखांची भेट घेतल्याचे जनरल मिले म्हणाले. याआधीही राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष पुुतिन यांच्याबरोबर मध्य आशियातील लष्करी तळांबाबत चर्चा केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण रशियाने या बातम्यांना दुजोरा दिला नव्हता.

leave a reply