तालिबानच्या विरोधात खडे ठाकणाऱ्या नॉर्दन अलायन्सला अमेरिकेने मान्यता द्यावी

- अमेरिकेच्या सिनेटर्सचे आवाहन

वॉशिंग्टन – तालिबानच्या बेकायदा राजवटीच्या विरोधात लढा देणाऱ्या नॉर्दन अलायन्सला बायडेन प्रशासनाने अधिकृत मान्यता द्यावी, असे आवाहन अमेरिकेचे वरिष्ठ सिनेटर लिंडसे ग्रॅहम व माईक वॉल्ट्झ यांनी केलेआहे. आत्तापर्यंत बायडेन प्रशासनाने नॉर्दन अलायन्सबाबतची आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. पण अफगाणिस्तानच्या पंजशीर खोऱ्यात नॉर्दन अलायन्सच्या छत्राखाली तालिबानविरोधी गट एकत्र आले आहेत. यामुळे पुढच्या काळात तालिबानसमोर आव्हान उभे करण्याचे सामर्थ्य नॉर्दन अलायन्सकडे आले असल्याचा दावा केला जातो. ताजिकिस्तानसारखा देश ठामपणे नॉर्दन अलायन्सच्या मागे उभा राहिलेला आहे. अशा परिस्थितीत ग्राहम आणि वॉल्ट्झ यांनी केलेली मागणी लक्षवेधी ठरते.

तालिबानचे कट्टर विरोधक असलेले अहमद शहा मसूद यांचा मुलगा अहमद मसूद व अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरूल्लाह सालेह तालिबानविरोधी आघाडीचे नेतृत्त्व करीत आहेत. रशिद खान दोस्तम हा तालिबानच्या विरोधातील नेता देखील त्यांना सामीलझाला आहे. तसेच अफगाणी लष्करातील तालिबानविरोधी गट शस्त्रास्त्रांसहीत नॉर्दन अलायन्समध्ये सहभागी होत आहे. पंजशीर खोऱ्यात या साऱ्यांची झालेली एकजूट तालिबानसाठी मृत्यूघंटा ठरू शकते. याची जाणीव झालेल्या तालिबानने मसूद व सालेह यांना चर्चेचा प्रस्ताव दिला.

वाटाघाटींद्वारे मतभेद सोडविण्याचे दावे तालिबानकडून केले जात असताना, हजारो दहशतवाद्यांना तालिबानने पंजशीर व्हॅलीसाठी रवाना केले. तालिबान आणि नॉर्दन अलायन्समध्ये संघर्ष सुरू झाल्याचे दावे केले जातात. यात शेकडो तालिबानी ठार झाल्याची माहिती नॉर्दन अलायन्सच्या नेत्यांनी दिली होती. याचे काही व्हिडिओज्‌ देखील प्रसिद्ध करण्यात आले होते. तर तालिबानने पंजशीर खोऱ्याला तीन बाजूंनी वेढल्याच्याही बातम्या येत आहेत. पण ताजिकिस्तानने नॉर्दन अलायन्सला पाठिंबा देण्याची ठाम भूमिका स्वीकारल्याने, नॉर्दन अलायन्सचा सामना करणे सोपे राहिलेले नाही, याची जाणीव तालिबानला झालेली आहे.

यामुळे तालिबानपेक्षाही तालिबानची पाठराखण करणारा पाकिस्तान अस्वस्थ बनला आहे. ताजिकिस्तानने नॉर्दन अलायन्सला शस्त्रास्त्रे पुरविल्याचे उघड झाल्यानंतर पाकिस्तानने तसे न करण्याच्या सूचना ताजिकिस्तानला केल्या होत्या. यासाठी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री कुरेशी यांनी ताजिकिस्तानला भेट दिली होती. पण ताजिकिस्तानने ही मागणी फेटाळली. यानंतर ताजिकिस्तानचा वापर करून भारतच नॉर्दन अलायन्सला तालिबानच्या विरोधात शस्त्रसज्ज करीत असल्याचे आरोप पाकिस्तानने सुरू केले होते.

तालिबान आणि नॉर्दन अलायन्स यांच्या घनघोर संघर्ष पेटला तर अफगाणिस्तानात अराजक माजेल आणि त्याचे परिणाम पाकिस्तानला सहन करावे लागतील, अशी चिंता पाकिस्तानातील कट्टरपंथिय व्यक्त करीत आहेत. भारत व अमेरिका या कटावर काम करीत असल्याची टीका पाकिस्तानच्या या विश्‍लेषकांकडून केली जाते. मात्र तालिबानसारख्या दहशतवादी संघटनेच्या हाती अफगाणिस्तान सोपविण्यापेक्षा नॉर्दन अलायन्सवर विश्‍वास ठेवणे अधिक चांगले ठरेल, असे अमेरिकन लोकप्रतिनिधींना वाटू लागले आहे.

अमेरिकेचे वरिष्ठ सिनेटर लिंडसे ग्रॅहम व माईक वॉल्ट्झ यांनी बायडेन प्रशासनाला केलेले आवाहन हेच दाखवून देते. तालिबानच्या अफगाणिस्तानवरील कब्जा अनाधिकृत ठरतो. अशा परिस्थितीत अमरूल्लाह सालेह व अहमद मसूद यांना साथ देऊन अमेरिकेने तालिबानला शह द्यावा, असा सल्ला सिनेटर लिंडसे ग्रॅहम व सिनेटर माईक वॉल्ट्झ यांनी दिला आहे.

leave a reply