माघारीनंतरही अमेरिकेचे जवान अफगाणिस्तानात तैनात असतील

- अमेरिकी अधिकार्‍याचा दावा

वॉशिंग्टन – अफगाणिस्तानातील युद्धात पराभूत झाली म्हणून अमेरिका माघार घेत आहे, असे दावे करून तालिबान आणि पाकिस्तानातील तालिबानच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे. अमेरिका अफगाणिस्तानातून पूर्ण माघार घेणार नसल्याचे संकेत मिळू लागले आहेत. माघारीनंतरही अमेरिकेचे 650 हून अधिक जवान अफगाणिस्तानात तैनात असतील, असे अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍याने स्पष्ट केले. अमेरिकेची संपूर्ण सैन्यमाघार ही तालिबानची प्रमुख अट होती. ती मान्य करण्यास बायडेन प्रशासन तयार नसल्याचे यामुळे स्पष्ट होत आहे.

माघारीनंतरही अमेरिकेचे जवान अफगाणिस्तानात तैनात असतील - अमेरिकी अधिकार्‍याचा दावाअफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी अमेरिकेच्या दौर्‍यावर असून येत्या काही तासात ते राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची भेट घेतील. त्याआधी अमेरिकेने अफगाणिस्तानातील आपल्या तैनातीबाबतची ही माहिती उघड केली. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी 11 सप्टेंबरपर्यंत पूर्ण सैन्यमाघारीची घोषणा केली होती. पण पुढच्या दोन आठवड्यात ही माघार पूर्ण होईल, अशी माहिती अमेरिकी अधिकार्‍याने आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला दिली. मात्र, या माघारीनंतरही अमेरिकेचे 650 जवान अफगाणिस्तानात तैनात असतील, असे या अधिकार्‍याने सांगितले.

अफगाणिस्तानातील अमेरिका आणि मित्रदेशांच्या राजनैतिक अधिकार्‍यांच्या सुरक्षेसाठी ही तैनाती असेल. याशिवाय राजधानी काबुलमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी घेणार्‍या तुर्कीला सहाय्य करण्यासाठी अतिरिक्त जवान तैनात असतील, अशी माहिती सदर अधिकार्‍याने दिली. अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने या बातमीवर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण तालिबान संघर्षबंदीच्या नियमांचे पालन करीत नसल्याची टीका अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी केली.

माघारीनंतरही अमेरिकेचे जवान अफगाणिस्तानात तैनात असतील - अमेरिकी अधिकार्‍याचा दावाअफगाणिस्तानातील तालिबानच्या हल्ल्यांनी जोर पकडला असून 1 मे पासून आत्तापर्यंत तालिबानने 50 जिल्ह्यांचा ताबा घेतला आहे. गेल्या चोवीस तासात बघलान, फरयाब, कुंदूझ, बल्ख, तखर, झाबुल आणि पाकतिया या प्रांतांमध्ये भीषण संघर्ष पेटला आहे. दोन दिवसांपूर्वी तालिबानच्या दहशतवाद्यांनी कुंदूझ प्रांताच्या उत्तरेकडील ताजिकिस्तान सीमेजवळच्या लष्कराच्या चौकीचा ताबा घेतला होता. तालिबानच्या या हल्ल्यानंतर सव्वाशेहून अधिक अफगाणी जवानांनी पळ काढला होता.

तालिबानच्या या कारवायांविरोधात स्थानिकांना सशस्त्र करण्यासाठी अफगाण सरकारचे प्रयत्न सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत. काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानाच्या अंतर्गत सुरक्षेचे उपमंत्री म्हणून निवड झालेले नकीबुल्ला फाएक यांनी ही घोषणा केली.

‘दहशतवाद्यांच्या कारवायांना उत्तर देण्यासाठी स्थानिकांकडून लष्कराला पाठिंबा मिळत आहे. ज्या अफगाणींना स्वत:च्या भूभागाची सुरक्षा करायची आहे, त्यांना शस्त्रास्त्रे, अन्न, वाहने आणि इतर साहित्य पुरविण्याची जबाबदारी सरकारची असेल’, अशी घोषणा फाएक यांनी केली. पण असे झाले तर अफगाणिस्तान नव्या गृहयुद्धात ढकलला जाईल, असा इशारा आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक देत आहेत. दरम्यान, अमेरिकेच्या सैन्यमाघारीचे जल्लोषाने स्वागत करणार्‍या तालिबान आणि पाकिस्तानातील तालिबानच्या समर्थकांसाठी, अमेरिकेची घोषणा मोठा हादरा ठरत आहे.

leave a reply